युवक कॉंग्रेसच्या वतीने अलका चौक येथील एलआयसीच्या कार्यालयासमोर निदर्शने..

पुणे : अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी करावी, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एलआयसी यासह इतर बँकांमधील जनतेचा पैसा सुरक्षित रहावा, यासाठी युवक कॉंग्रेस आणि ‘एनएसयुआय’ तर्फे अलका चौक, पुणे येथील एलआयसीच्या कार्यालयासमोर निदर्शने व आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन, युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष राहुल शिरसाट, ‘एनएसयुआय’चे अध्यक्ष भुषण रानभरे, कोथरूड विधानसभा विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष राज गोविंद जाधव, बळीराम डोळे, सौरभ आमराळे, दिलीप जाधव, अभिजीत हळदेकर, अक्षय माने, परवेज तांबोळी, अजित ढोकळे, प्रसन्न मोरे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज जाधव म्हणाले, मोदी सरकारच्या मेहरबानीने जनतेच्या पैशावर गर्भश्रीमंत झालेल्या अदानींचा गैरकारभार हिंडेनबर्ग रिपोर्टने जनतेसमोर आला आहे. बोगस कंपन्या उभारून शेअर्सची किंमत वाढवून लाखो कोटीचे कर्ज एसबीआय, एलआयसी आणि इतर बँकांकडून घेतले. हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे शेअर्सच्या किंमती कमी झाल्या. गुंतवणुकधारकांचे लाखो कोटी बुड़ाले, त्याचा फटका अदानींना नाही तर जनतेला बसला आहे. एसबीआय व एलआयसीमध्ये गुंतवणूक केलेले नागरिक अडचणीत आले असून, त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. जनतेचा पैसा सुरक्षित रहावा यासाठी आजचे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.




