ससूनचे किमान ६० टक्के बेड्स कोविडसाठी उपलब्ध करा RT-PCR चाचण्यांची क्षमता वाढवा महापौर मोहोळ यांची मागणी

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांची पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या विषयांवर भेट घेऊन चर्चा केली.
मोहोळ म्हणाले, पुणे शहरात दररोज सरासरी २५ हजारांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या होत असल्या, तरी त्यातील सरकारी पातळीवरील RT-PCR चाचण्यांची संख्या केवळ २ हजारांच्या आसपास आहे. ही संख्या तातडीने वाढवावी, यासाठी गेली अनेक दिवस मी सातत्याने पाठपुरावा करत आहोत. यासंदर्भात डॉ. तांबे यांच्याकडे तातडीने ही क्षमता वाढविण्यासाठी चर्चा केली. सरासरी २५ हजार पैकी २३ हजार चाचण्या या खाजगी लॅबमधून होत असल्याने संसर्गाची भीती जास्त आहे. कारण खाजगी लॅबमध्ये टेस्टिंग केल्यावर संबंधित रुग्ण संबंधित व्यक्ती विलगीकणात राहीलच असे नाही, त्यामुळेच संसर्ग वाढण्याचा धोका आहे.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ससून रुग्णालयात एकूण बेड्सची संख्या १ हजार ७५० इतकी आहे. मात्र असं असतानाही कोरोनासाठी केवळ ५२० बेड्स ससूनने उपलब्ध केले आहेत. एकीकडे शहरातील सर्व रुग्णालयांचे ८०% बेड्स कोविडसाठी राखीव ठेवले असताना ससूनमध्ये मात्र ही टक्केवारी अत्यंत कमी आहे. म्हणूनच ससूनमध्ये किमान ६० टक्के बेड्स तरी राखीव ठेवावेत, या संदर्भातही चर्चा केली. असे झाल्यास आणखी जवळपास ५०० बेड्स उपलब्ध होतील.
ससून रुग्णालयात #PMCares च्या माध्यमातून एकूण ८६ व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते. त्यापैकी ५४ व्हेंटिलेटर सुरू असून ३२ व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याचे डॉ. तांबे यांच्याकडून सांगण्यात आले, याबाबत चर्चा झाली.आपल्या पुणे महानगरपालिकेला #PMCares मधून एकूण ३४ व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते. त्यापैकी ३३ व्हेंटिलेटर सुरू असून त्याचा वापर उपचारांसाठी केला जात आहे. पुणे महापालिकेला मिळालेले व्हेंटिलेटर सुरु असताना ससूनमधील व्हेंटिलेटर बंद राहण्याचे कारण काय? हा प्रश्न उपस्थित राहिला आहे त्याचाही खुलासा लवकर होईल. असेही मोहोळ म्हणाले.






