पुणे दर्शन पीएमपीएमएल बस सेवेत या महत्वाच्या ठिकाणांचा समावेश करावा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार )शहराध्यक्ष किशोर कांबळे यांची मागणी
पुणे : पुणे शहराला भेट देण्यासाठी, अभ्यासासाठी देश
विदेशातील नागरीक येत असतात. या पर्यटकांसाठी पी एम पी एम एलच्या वतीने पुणे दर्शन बस सेवा सुरू आहे. मात्र या पुणे दर्शन बस सेवेत काही महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश करण्यात आला नसल्याने या ठिकाणांकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कांबळे यांनी पीएमपीएमएल प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
पुणे दर्शन बस सेवेत पुणे शहरातील ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळांचा समावेश आहे. मात्र काही मुख्य स्थळांचा त्यात समावेश करणे गरजेचे आहे. त्यामध्ये शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे जगातील पहिले स्मारक, आद्य क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे तालीम, व स्त्री शिक्षणाचे आद्य पुरस्कर्ते, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा फुलेवाडा, या तीन ठिकाणांचा पुणे दर्शन बस सेवेत समावेश करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कांबळे यांनी केली आहे.

या संदर्भातील निवेदन कांबळे यांनी महापालिका प्रशासन व पीएमपीएमएल प्रशासनाला दिले आहे. यावेळी कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, पायल चव्हाण, मधुकर भगत, केतन ओरसे, रमिज सय्यद, अजय पवार, जयदीप देवकुळे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महामानवांचा इतिहास जगभरात पोहचविण्यासाठी आपण वरील तीन स्थळांचा समावेश पुणे दर्शन बस सेवेत करावा आणि समस्त शिवराय – फुले-शाहू-आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या पुणेकरांची ही मागणी तातडीने पूर्ण करावी अशी मागणी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. प्रशासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे किशोर कांबळे यांनी सांगितले आहे.


