
पुणे : तरुणाईचा जल्लोष कार्यकर्त्यांचा उत्साह ढोल ताश्यांचा निनाद भक्तीचा महासागर गुलालाची उधळण रात्रभर जागरण गणपती बाप्पा मोरयाच्या गगनभेदी घोषणा आणि डोळे दिपविणारा विसर्जन मिरवणूक सोहळा कोरोनाच्या संकटामुळे या सगळ्यालाच पुणेकरांनी मिस केले. या विसर्जन मिरवणुकी दरम्यान दरवर्षी रंगतो. राजकीय गप्पांचा फड पण गेल्या ४०-४५ वर्षांची प्रथा,परंपरा खंडित होवू द्यायची नाही असे राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी ठरविले.
आणि दरवर्षीप्रमाणे सर्वपक्षीय कार्यकर्ते होय कार्यकर्तेच – कारण येथे महापौर खासदार आमदार असे सर्वांचे नेतेपण गळून पडते आणि उरतो तो फक्त गणेशभक्त पुणेकर. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी आझाद क्लाथ स्टोअर्स लक्ष्मी रस्ता येथे सकाळी ११ वाजता एकत्र आले. आणि मग रंगला तो गप्पांचा फड.
अनंतचतुर्दशी दिवशी पहिल्यांदाच सुन्या- सुन्या असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर आठवणींचा खजिना रिता करताना महापौर मुरलीधर मोहोळ,उल्हास पवार,मोहन जोशी,बाळासाहेब शिवरकर,डॉ. सतीश देसाई,स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,उपमहापौर सरस्वती शेंडगे,रवींद्र माळवदकर,संदीप खर्डेकर, महेश सूर्यवंशी,वीरेंद्र किराड,सुनिल माने,रवी चौधरी,शैलेश गुजर,मृणाल ववले,सतीश मोहोळ, सह पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे,अतिरिक्त आयुक्त संजय शिंदे,उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी उपस्थिती लावून सर्वांच्या आनंदात भर घातला.पत्रकार मित्रांसह अनेकांच्या उपस्थितीने गप्पागोष्टी खुलल्या. उत्तम कटारिया यांनी उपस्थितांचे शाल देऊन सत्कार केला.
यावर्षी सर्वांनीच मानपान बाजूला ठेवून अतिशय साधेपणाने आणि भान राखून उत्सव साजरा केल्याबद्दल सर्वांनीच गणेशमंडळांच्या कार्यकर्त्यांचा गौरवपुर्ण उल्लेख केला.
संदीप खर्डेकर म्हणाले, मी ही साधारण ८८ सालापासून या मिरवणुकीचा एक भाग आहे.अलका चौकात महापौर यांच्या स्वागत मंडपासमोर पतित पावन संघटनेचा स्वागत मांडव असे व रात्रभर तेथे माईक वर चालणारी जुगलबंदी हा पुणेकरांसाठी एक पर्वणीच असे.
आज जमलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी एखाददुसरा अपवाद वगळता या मिरवणुकीला कधी गालबोट लागू दिले नाही. विविध विचारसरणीच्या नेत्यांनी एकत्र येउन उत्सवात सहभागी होणे हे पुण्याचे सांस्कृतिक वैभव म्हणावे लागेल.
आता पुढच्या वर्षी गणपतीबाप्पा ने विघ्न हरावे.आणि त्याच जल्लोषात गणेशोत्सव पार पाडण्यासाठी हे संकट दूर करावे या प्रार्थनेसह ही मैफिल संपली .



