स्व.रामभाऊ बराटे आदर्श कार्यकर्ता पुरस्कार शरद बुट्टे पाटील यांना प्रदान..

वारजे : सार्वजनिक कामांऐवजी इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून लोकांमध्ये असणाराच आज लोकप्रिय नेता अशी नेत्याची नवीन व्याख्या झाली आहे. पूर्वीसारखे कार्यकर्ते व राजकारण आता राहिले नाही. आज नेत्यांच्या प्रत्येक गोष्टीत इव्हेंट मॅनेजमेंट आले असल्याची खंत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे माजी सभापती रामभाऊ बराटे मित्र परिवाराच्या वतीने दिला जाणारा स्व.रामभाऊ बराटे आदर्श कार्यकर्ता पुरस्कार शरद बुट्टे पाटील यांना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, सचिन बराटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, मुरलीधर निंबाळकर आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, कार्यकर्ता संभाळला तर नेतेपण कायम टिकून राहते अशी शिकवण आम्हाला विलासराव देशमुख यांनी दिली. पण आता नेता व कार्यकर्ता यांच्या समन्वय राहिला नाही. पूर्वी कार्यकर्त्यांना किंमत होती पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. आता सार्वजनिक फायद्याऐवजी वैयक्तिक फायद्यासाठी सर्वकाही सुरू आहे.

अशोक मोहोळ म्हणाले, आता कोणामध्ये पक्ष प्रेम राहिलेलं नाही. आता राजकरणात निष्ठाच राहिलेली नसल्याने निष्ठेने काम करणारे कार्यकर्तेही मिळत नाहीत त्यामुळे आजच्या राजकारणावर न बोललेले बरे.
पुरस्काराला उत्तर देताना शरद बुट्टे पाटील म्हणाले, चांगल्या कामाची राजकीय पक्षापलीकडे नोंद ठेवली जाते. आज कार्यकर्त्यांना कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी ताकद दिली पाहिजे. फ्लेक्स बाजी करून नाही तर कामाच्या जोरावर कार्यकर्ता लोकांच्या मनात कायम जिवंत राहतो.



