धुक्यामुळे दिसत नसल्याने सकाळी चालताना नागरिकांना अडचण ; पथ दिव्यांची वेळ वाढवण्याची राजाभाऊ गोरडे यांची मागणी..

पुणे : सध्या पहाटे दाट धुक पडत असल्यामुळे सध्या शहरात महाबळेश्वर, पाचगणी सारखे वातावरण आहे. मात्र सकाळी कोथरुड व पुणे शहरातील रस्त्यावरील पथ दिवे ठरलेल्या वेळेप्रमाणे बंद केले जात असल्याने सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना धुक्यामुळे अडचणी येत आहे. त्यामुळे पथदिव्यांची वेळ काही मिनिटांनी वाढवण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक राजाभाऊ गोरडे यांनी कोथरुड क्षेत्रीय कार्यालय विद्युत विभागाकडे केली आहे.
सध्या सकाळी दाट धुके पडत असल्याने समोर काही अंतरावरचे दिसणे अवघड झाले आहे. पथ दिवे सुरू असतील तर चालताना काही अंशी मदत मिळते, पण पथदिवे बंद झाल्यानंतर ही धुके असेल तर चालताना अडथळा होत आहे. तसेच सकाळी काही वाहनेही रस्त्याने ये जा करत असतात. अशात पुढचे दिसले नाही तर अपघाताचा धोकाही होऊ शकतो.
सकाळी चालण्याचा व्यायाम करण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यात जेष्ठ नागरिक, महिला वर्ग, तरुण या सर्वांचाच समावेश असतो. धुक्यामध्ये फिरण्याचा आनंद घेण्यासाठीही काहीजण बाहेर पडत आहेत. त्यामुळे सकाळी चालताना धुक्यात समोरचे दिसावे म्हणून ६.४५ वाजता बंद करण्यात येणारे पथदिवे ७ किंवा ७.१५ पर्यंत चालू ठेवावेत अशी मागणी गोरडे यांनी केली आहे.




