समतेबरोबर पर्यावरण संवर्धनाचा विचार मांडणाऱ्या थोर समाज सुधारकांना जयंतीनिमित्त वृक्षारोपणातून अभिवादन !

कर्वेनगर मध्ये नगरसेवक स्वप्नील दुधाने यांचा अनोखा अभिवादन कार्यक्रम
कर्वेनगर : क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्वेनगर मधील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल आणि शिवणे ते खराडी कर्वेनगर हद्दीतील १०० फुटी डीपी रस्ता या ठिकाणी वृक्षारोपण करत या थोर समाज सुधारकांना अभिवादन करण्यात आले.
नगरसेवक स्वप्नील दुधाने यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय समाजातील दूषित गोष्टी दूर करून स्वच्छ वातावरण निर्माण करणारे महापुरुष आणि त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहत २५ देशी रोपांचे रोपण केले. या उपक्रमात कांचन, बकुळ, पिंपळ, कडुलिंब अशा सर्व भारतीय वृक्षांना मोठे करण्याचा संकल्प करण्यात आला.

या महापुरुषांच्या कार्याची सावली आपले जीवन सुसह्य बनवत असताना त्यांच्या शिकवणीची मुळे समाजात खोलवर रुजावी आणि समतेची गोमटी फळे सर्वांना चाखता यावी, अशी भावना व्यक्त करताना नगरसेवक स्वप्नील दुधाने पुढे म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव प्रामुख्याने सामाजिक न्याय, समानता आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून घेतले जाते. मात्र त्यांच्या विचारांमध्ये पर्यावरण, पाणी व्यवस्थापन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे शाश्वत नियोजन यालाही अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. पाणी, जमीन, वनसंपदा आणि पर्यावरणाचे वैज्ञानिक व्यवस्थापन यावर त्यांनी दिलेला भर आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरतो.
त्यांच्या विचारांमधून समता, विकास आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल साधण्याचा मार्ग आपल्याला मिळतो. म्हणूनच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केल्याचे दुधाने म्हणाले.






