भाजपचा एकही नेता महागाईवर बोलायला तयार नाही : संजय राऊत

मुंबई : देशात महागाईचा भडका उडालेला असतानाच घरगुती गॅस सिलेंडरचे भाव ५० रुपयांनी वाढले आहेत. यामुळे आता ९९९.५० रुपयांवर सिलेंडरचे दर पोहोचले आहेत. त्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. नरेंद्र मोदींपासून भाजपचा एकही नेता सर्वसामान्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. एकानेही आतापर्यंत सिलेंडरवर भाष्य केलेलं नाही, राऊतांनी म्हटलंय. लाऊड स्पीकर हा सर्वसामान्यांचा मुद्दाच नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
पंतप्रधान मोदी युरोपात जाऊन रशिया आणि युक्रेनबद्दल भाष्य करतात. त्यांना या देशांची चिंता आहे. त्यासंदर्भात ते मध्यस्ती करत आहेत. यावर त्यांचे भक्तही वाह वा करत आहेत. पण देशातील जनता बेरोजगारी, महागाईने त्रस्त आहे. सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीबद्दल कोणीही बोलायला तयार नाही, असं राऊत म्हणाले. महागाईवर एकही भाजप नेता बोलत नाही. पण भोंग्यांवर बोलतात. पंजाबचे पोलीस काय करतायेत, महाराष्ट्राचे पोलीस काय करतायेत, हे प्रश्न भाजपवाले विचारतात. देशातीत महागाईवर बोलायला एकही नेता तयार नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. भोंग्याच्या मुद्द्याचा फटका सर्वाधिक हिंदू मंदिरांना बसल्याचा दावाही त्यांनी केला.




