नियम डावलून कर्ज वाटप केल्याप्रकरणी सारस अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चौकशीचे आदेश

पुणे : सारस अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष व संचालक मंडळाने नियम डावलून कर्ज वाटप केल्या प्रकरणी आलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. ए. अरगडे यांनी वारजे माळवाडी पोलिसांना दिले आहेत. Saras Urban Co-op Credit Society Inquiry Order
नियमांचे उल्लंघन करत सारस अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष व संचालक मंडळाने कोट्यवधी रुपयांची कर्ज वाटप केल्याची तक्रार सचिन फोलाने यांनी न्यायालयात दाखल केल्यानंतर त्याची दखल घेत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. ए. अरगडे यांनी वरील आदेश दिले आहेत.
सारस अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या कार्यकारिणीविरुध्द सचिन फोलाने यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सहकार विभागाकडे तक्रार दिली होती. पंतसंस्थेचे अध्यक्ष गणेश धारप यांच्या व्यवस्थापनाखाली कर्जदारांची पत चाचणी किंवा मालमत्तेचे मूल्यांकन न करता कोट्यवधी रुपयांची कर्जे वितरित करण्यात आली. कर्जदारांच्या सातबारा उताऱ्यावर कर्जाच्या नोंदी होऊ दिल्या नाहीत. त्यामुळे या जमिनीचे परस्पर विक्री व्यवहार करता येत असत. असे गैरव्यवहार हाताळण्यासाठी धारप यांनी लाच घेतल्याचा आरोप ही तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या एका माजी अध्यक्षाला संचालक मंडळाच्या पूर्वमान्यतेशिवाय विनातारण मुदत ठेवीवर कर्ज आणि ओव्हर ड्राफ्टची सुविधा उपलब्ध करून दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या व्यक्तीचे नाव थकबाकीदरांच्या यादीत असतानाही राजकीय ओळखीमुळे त्याच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.




