
पुणे : कोथरूड मधील महर्षी कर्वे पुतळा चौकाजवळ लोढा पेट्रोल पंपामागील ओढ्यामधून मल निस्सारण वाहिनीचे सांडपाणी वाहत असल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून आरोग्याच्या समस्येने कोथरूड मधील नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून हे पाणी ओढ्या तून वाहत आहे.
पुणे महापालिकेच्यावतीने लोढा पेट्रोल पंप ते प्रतिकनगर या दरम्यान मोठ्या व्यासाची मल निस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे मल निस्सारण वाहिनीचे पाणी थेट ओढ्यामध्ये वाहत आहे. त्यामूळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. डासांचे प्रमाण वाढले आहे. आणि आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

पुणे महापालिकेने मल निस्सारण वाहिनीचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करुन ओढ्यामध्ये वाहणारे अस्वच्छ पाणी तातडीने बंद केले पाहिजे. जेणेकरून स्थानिक नागरिकांना आरोग्याची समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबतीत बोलताना पुणे महापालिकेचे मल निस्सारण विभागाचे अभियंता लिटके म्हणाले, या भागातील जुन्या मल निस्सारण वाहिनीमध्ये मोठ्या प्रमाणात चोकअप होत असल्याने नविन मोठ्या व्यासाची वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले असून त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हे काम दोन महिन्यात पूर्ण होणार आहे.












