वारजे गणपती माथा ते माळवाडी चौक दरम्यान रस्त्यावर वाहतय सांडपाणी : बाबा धुमाळ यांच्याकडून आंदोलनाचा इशारा..

संबधित विभागाकडून ५० लखाच्या निधी मान्यतेसाठी प्रस्ताव
वारजे : एनडीए मुख्य रस्त्यावर गणपती माथा ते वारजे माळवाडी चौक दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाईन चे सांडपाणी वाहत असल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. व्यावसायिक, पादचारी, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. यावर तातडीने उपाययोजना करा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नागरिकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी दिला आहे.
या संदर्भातील निवेदन माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्यावतीने महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. मलनिःसारण देखभाल दुरुस्ती विभागाच्या वतीने संबंधित ठिकाणच्या ड्रेनेज लाईनच्या कामासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे बाबा धुमाळ यांनी सांगितले.
धुमाळ म्हणाले, मुख्य एनडीए रस्त्यावर ड्रेनेजचे सांडपाणी वाहत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तसेच या परिसरात प्रवास करणारे शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना या दुर्गंधी मधून प्रवास करावा लागत
आहे. या रस्त्यालगत अनेक दुकाने, छोटे मोठे हॉटेल, स्टॉल आहेत त्यांना देखील फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी झाल्यावर जे नागरिक पायी चालत प्रवास करत असतात त्यांना देखील या दुर्गंधी पाण्यातून चालत जावे लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या प्रकाराकडे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष आहे संबंधित अधिकारी लक्ष देत नव्हते त्यामुळे निवेदनाद्वारे आपण त्यांना आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पुणे मनपा वार्षिक २०२३ – २४ अंदाजपत्रकामध्ये या गणपती माथा ते वारजे माळवाडी चौक मुख्य रस्त्यावरील संपूर्ण ड्रेनेज लाईन बदलणे या साठी निधीची तरतूद करण्यात आली होती परंतु प्रशासन व संबंधित अधिकारी यांच्या दुर्लक्षतेमुळे सदर बजेट लॅप्स झाले. यामुळे सदर परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे धुमाळ यांनी संगितले.
ही मलनिस्सारण वाहिणी बदलणे अत्यंत गरजेचे आहे. पूर्वीची ड्रेनेज लाईन ही २० ते २५ वर्षांपूर्वी तेव्हाच्या लोकसंख्येचा विचार करून महापालिकेने टाकलेली होती. परंतु सध्या लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून मोठ्या व्यासाची मलनिःसारण वाहिनी सदर मुख्य रस्त्यावर लवकरात लवकर बदलून देण्यात यावी अशी मागणी आपण केली आहे.
या संदर्भात मलनिःसारण देखभाल दुरुस्ती विभागाचे अधीक्षक अभियंता दिनकर गोजारे यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की संबधित ठिकाणाची अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली आहे व या कामासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा यासाठी विषय मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. आठ दिवसात निधी मंजूर झाल्यानंतर येथील काम सुरू करण्यात येईल. या ठिकाणी पूर्वीच्या लहान व्यासाच्या मलनिःसारण वाहिन्या असून वाढलेल्या लोकसंख्येमुळे त्यावर प्रचंड ताण आलेला आहे, त्यामुळे मोठ्या व्यासाच्या मलनिःसारण वाहिन्या टाकाव्या लागणार आहेत. या कामासाठी निधी मंजूर झाला होता परंतु निविदा प्रक्रिया, निवडणुका, आचारसंहिता यात वेळ गेल्याने बजेट लॅप्स झाले होते. येथील मलनिःसारण वाहिन्यांचा सर्वे झाला आहे. आता क्रॉसिंग तसेच दुरवस्था झलेल्या ठीकणची दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध विषय मान्यतेला दिला आहे लवकरच येतील काम सुरू करण्यात येईल व पुढील टप्प्यात मोठ्या व्यासाच्या मलनिःसारण वाहिन्या टाकण्याचे काम करण्यात येईल.









