पुणे शहरमहाराष्ट्र

रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा
पुण्याला कमी पडू दिला जाणार नाही-अमित देशमुख

मंत्रालयातील बैठकीत वैद्यकीय, शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आश्वासन

– मोहन जोशी

पुणे : कोरोनावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर इंजेक्शनच्या चार उत्पादक कंपन्यांशी वैद्यकीय, शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी संपर्क साधला त्यावेळी पुण्यात या इंजेक्शनचा तुटवडा भासू दिला जाणार नाही अशी हमी त्या कंपन्यांनी दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

गेल्या काही दिवसापासून पुण्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. यासाठी उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधून ही इंजेक्शन्स उपलब्ध करुन द्यावीत अशी मागणी मोहन जोशी यांनी वैद्यकीय, शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे मुंबईत, मंत्रालयात भेट घेऊन केली. ही मागणी ऐकल्यावर देशमुख यांनी तातडीने दखल घेतली आणि आरोग्य संचालक तात्यासाहेब लहाने यांना बोलावून घेतले आणि रेमडेसीवीरच्या उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधण्यास सांगितले. त्याप्रमाणे संपर्क साधण्यात आला. सुमारे एक लाख इंजेक्शन्सचा साठा कंपन्यांकडे उपलब्ध आहे अशी माहिती चार उत्पादक कंपन्यांनी दिली. सरकारी आणि खाजगी रुग्णालयांनी आवश्यकतेनुसार ७२ तास आधी ऑर्डर नोंदविल्यास इंजेक्शन्सचा पुरेसा पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन इंजेक्शन्स उत्पादकांनी मंत्री देशमुख यांना दिले, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

IMG 20200922 WA0013 5

मंत्र्यांसोबत बैठक झाल्यावर पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी मोहन जोशी यांनी संपर्क साधला आणि कंपन्यांनी दिलेल्या हमीची माहिती राव यांना दिली आणि त्याप्रमाणे कार्यवाही करावी अशी सूचना राव यांना केली. लगेचच कार्यवाही करण्याचे आश्वासन राव यांनी जोशी यांना दिले.

मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार २० सप्टेंबरपासून राज्य शासनाने रेमडेसीवीर इंजेक्शनची किंमत कमी करुन ती बावीसशे रुपये निर्धारित केली आहे. त्यानुसार रुग्णांकडून आकारणी केली जावी. इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये आणि ते खाजगी बाजारपेठेतही उपलब्ध व्हावे अशी मागणी मोहन जोशी यांनी विभागीय आयुक्तांकडे केली.

इंजेक्शनच्या तुटवड्या संदर्भात वैद्यकीय, शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी तातडीने हालचाली केल्याबद्दल मोहन जोशी यांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये