वारजे आत्महत्या प्रकरणात अटकेची कारवाई होत नसल्याने नातेवाईकांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

वारजे पोलिसांवर माई मंगेशकर हॉस्पिटलचा दबाव ; नातेवाईकांचा आरोप
वारजे : महिला आत्महत्या प्रकरणात वारजे पोलीस दोषींवर अटकेची कारवाई करण्यास जाणीवपूर्वक विलंब करत असल्याचा आरोप करत आत्महत्या ग्रस्त महिलेच्या नातेवाईकांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
वारजे परिसरात ९ मे रोजी महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. वारजेतील माई मंगेशकर हॉस्पिटल मध्ये नोकरीच्या ठिकाणी मानसिक त्रास दिला जात असल्याने संबधित महिलेने आत्महत्या केल्याचे लिहिलेल्या चिठ्ठीतून पुढे आले होते. मात्र आत्महत्या होऊन १ महिना होत आला असला तरी वारजे पोलिसांकडून अजून संबंधितांना अटक करण्यात आली नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप या आधीच महिलेच्या नातेवाईकांनी केलेला आहे.
वैशाली गायकवाड दिघे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्या वारजे येथील माई मंगेशकर हॉस्पिटल मध्ये नोकरीला होत्या. नोकरीच्या ठिकाणी मानसिक त्रास दिला जात असल्याने त्याला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट मधून पुढे आले आहे. त्यांनी लिहिलेल्या नोट मध्ये त्रास देत असलेल्या व्यक्तींचीही नावे दिलेली आहेत.
ही घटना घडल्यानंतर वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास बराच वेळ घेतला होता. महिलेच्या नातेवाईकांनी पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांना अखेर गुन्हा दाखल करावा लागला. पण गुन्हा दाखल करून १३ दिवस झाले तरी दोषींवर अजून अटकेची कारवाई नसल्याने पोलीस कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का ? असा प्रश्न नातेवाईक उपस्थित करत आहेत.

वारजे पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने आज आत्महत्या ग्रस्त वैशाली गायकवाड दिघे, यांचे पती सुनील दिघे व त्यांच्या घरच्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत प्रकरणाची माहिती दिली व न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. पोलीस आयुक्तांनी संपूर्ण विषय समजावून घेऊन संबधिंतावर कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. वारजे पोलिस माई मंगेशकर हॉस्पिटलच्या दबावाखाली काम करत असून दोषींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप सुनील दिघे यांनी केला आहे.






