बराटे यांना राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार प्रदान

मुंबई: मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. राज्यातील कृषी व ग्रामीण पर्यटनातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ (मार्ट) चे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांना राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार २०२० ने सन्मानीत करण्यात आले.
या सोहळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रातून निवडण्यात आलेल्या ७० पुरस्कार प्राप्त मानकऱ्यांना इ-मानपत्रे देण्यात आली. सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. केशव महाराज सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या बीजभाषणात त्यांनी पुरस्कार मानकरी गुणवंतांनी पुरस्काराच्या प्रेरणेतून आपले भारत राष्ट्र अधिक शक्तिशाली आणि संपन्न बनविण्यासाठी आपले संपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन केले. दुर्जन शक्तीच्या वाढत्या प्रादुर्भावाला जर पराभूत करायचे असेल तर तुमच्यासारख्या गुणवंतांच्या सज्जन शक्तीचे संघटन देशात निर्माण व्हायला हवे; असे प्रतिपादन त्यांनी केले.
तत्वचिंतक ह. भ. प. श्यामसुंदर महाराज सोन्नर, ज्येष्ठ समाजसेवक अशोकानंद जवळगावकर, ज्येष्ठ साहित्यिक रमेश आव्हाड, ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर, आदर्श शिक्षिका मनिषा कदम, प्रगती साळवेकर, वनस्पती तज्ज्ञ गायत्री घावटे तसेच आयकर अधिकारी अरुणा परब यांनी या समारंभाला विशेष पाहुणे म्हणून ऑनलाईन उपस्थिती नोंदविली आणि व्हिडिओद्वारे आपले शुभ संदेश दिले. व्यासपीठावर शिवयोगी मीराताई आणि प्रगतिशील शेतकरी उद्योजक श्री. पांडुरंग दादा मातेरे उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटाचा संपूर्ण जगातून नायनाट व्हावा, असे साकडे गणरायाला घालत श्री गजाननाची ऑनलाईन आरती करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट श्री. कृष्णाजी जगदाळे यांनी उपस्थितांना ऑनलाईन ग्लोबल गुणीजन शपथ प्रदान केली आणि गुणिजन संसदेत पुरस्कार प्राप्त मानकऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.



