वारजेत महापालिकेची मोठी कारवाई ; व्यावसायिक शेड जमीनदोस्त

वारजे : वारजेतील अनधिकृत व्यावसायिक शेड वरती महापालिकेने कारवाई करत ही शेड्स जमीनदोस्त केली. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. माळवाडीतील गार्डन सिटी मागे असणाऱ्या बीडीपीतील पत्रा शेडवर कारवाई करत १९ हजार चौरस फूटाचे क्षेत्र मोकळे केले.
या अनधिकृत शेड कारवाई बाबत बांधकाम विकास विभागाकडून आगोदरच नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी कारवाई होणार हे निश्चित मानले जात होते. मात्र नोटिसा दिल्या असल्या तरी कारवाई कधी होणार याबाबत वारजे परिसरात चर्चा सुरू होती. नोटिसा देऊनही अतिक्रमण तशीच ठेवल्याने आज अखेर कारवाई करत पत्र्याची व्यावसायिक शेड भुईसपाट करण्यात आली.

ही कारवाई बांधकाम विकास विभाग झोन 3 चे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे, उपअभियंता देवेंद्र पात्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम विकास विभागाचे कनिष्ठ अभियंता सतीश शिंदे, अजित ववले, संदेश कुळवमोडे, गंगाप्रसाद दंडीने, तुलीप इंजीनिअर, शुभांगी मेश्राम, प्राची सर्वगोड यांनी तिन जेसीबी, दोन ब्रेकर, दोन गॅस कटर १० बिगारी तसेच अतिक्रमणचे ४ पोलीस, स्थानिक ४ पोलीस, फायरब्रिगेड तसेच विद्युत महावितरण कर्मचारी यांच्या सहाय्याने करण्यात आली.






