पुणे शहर

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला वेग – महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे महानगरपालिका आणि वैद्यकीय शिक्षण ट्रस्टमध्ये तीन करार

पुणे: पुणे महापालिकेच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती मिळाली असून पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट यांच्यात तीन सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामुळे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय साकारण्यासाठी महत्वाचा टप्पा ओलांडला आहे.अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

वैद्यकीय शिक्षण ट्रस्टच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. यावेळी तीन करार करण्यात आले आहेत.  बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर  सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, मालमत्ता उपायुक्त राजेंद्र मुठे, सामान्य प्रशासन विभागाचे सुनील इंदलकर, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, सहायक आरोग्यप्रमुख अंजली साबणे, विधी अधिकारी अॅड मंजुषा इंदुले, अॅड निशा चव्हाण उपस्थित होते.

‘महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स’कडून आलेल्या निर्देशानुसार कमला नेहरू हॉस्पिटल आणि वैद्यकीय शिक्षण ट्रस्टमधील करारनामा, तसेच मालमत्ता व्यवस्थापन व वैद्यकीय शिक्षण ट्रस्टसाठी देत असलेल्या जमिनीकरता करारनामा आणि पुणे महानगरपालिका व वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट यांच्यामधील करारनामा या तिन्ही सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करत मान्यता दिली.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय ट्रस्टमध्ये पक्षनेत्यांचाही समावेश करण्यात आला असून शहर अभियंता, मुख्यलेखापाल, मालमत्ता उपायुक्त, मुख्य विधी अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधिक्षक यांचाही समावेश ट्रस्टमध्ये सभासद म्हणून करण्यात आला आहे.

मोहोळ म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालय वेगाने प्रत्यक्षात साकारण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु असून तांत्रिक बाबींचाही पाठपुरावा जलद गतीने केला जात आहे. तसेच या वैद्यकीय महाविद्यालयाचे बोधचिन्ह तयार करण्याचे कामही हाती घेतले आहे.

7 11

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये