महापालिका आयुक्तांनी चूक मान्य करून दुरुस्त्या कराव्यात : संदीप खर्डेकर

पावसात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून संदीप खर्डेकर यांचे आयुक्तांना अवाहन
पुणे : अवकाळी आणि अल्पावधीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचल्याचा दावा प्रशासनाने करत आहे, तर विविध सोसायट्यात ब्लॉक बसविल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा शोध लावला जात आहे. मात्र प्रशासनाने चुकीची कारणे देण्यापेक्षा चूक मान्य करून ती दुरुस्त करून सामान्य पुणेकरांना दिलासा द्यावा व मनाचा मोठेपणा आणि कार्य कुशलता दाखवावी असे अवाहन भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना केले आहे.
खर्डेकर म्हणाले, आयुक्तांना दोनच रस्त्यांची माहिती देतो, त्यांनी प्रत्यक्ष येऊन बघावे. महिन्याभरापूर्वी उत्तम डांबरीकरण केलेला समर्थ पथ ( अलंकार पोलीस स्टेशन ते प्रतिज्ञा मंगल कार्यालय )आणि कर्वेनगर मधील कमीन्स इंजिनियरिंग कॉलेज समोरचा पाणंद रस्ता !! या दोन्ही रस्त्यावर चार दिवसापूर्वीच्या अकल्पित पावसामुळे सगळीकडे पाणी साचले होते. मात्र त्यानंतर झालेल्या किरकोळ पावसातही या रस्त्यावर जागोजागी तळी साचलेली दिसत आहेत. हे डांबरीकरण नीट न झाल्यामुळे आहे असे स्पष्टपणे दिसत आहे.

या दोन्ही रस्त्यांचा उतार, चेंबर चे ठिकाण,याचा अभ्यास न करताच डांबरीकरण केले जाते आणि सामान्य नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतो. पावसाळी व ड्रेनेज लाईन्स च्या सफाई बाबत तर न बोललेलेच बरे. समर्थ पथावर प्रतिज्ञा मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर प्रचंड पाणी साचले व तेथील सोसायटीत घुसलेले पाणी चार तासानंतर उपसता आले.
गत वर्षी देखील येथे अशीच गंभीर स्थिती झाली होती व स्वतः आयुक्त विक्रमकुमार यांनी रात्री उशिरापर्यंत पाण्याचा निचरा होईपर्यंत तेथे थांबून मदतकार्य केले होते. यावर्षी याची पुनरावृत्ती होताना नागरिकांना प्रश्न पडला की ” येथे मोठ्या व्यासाची पावसाळी लाईन टाकण्याचे प्रशासनाचे आश्वासन कुठे विरले ? मिळालेल्या माहितीनुसार यासाठी एक कोटीचे बजेट देखील मान्य झाले होते, ते कुठे गेले याची चौकशी व्हावी अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे.
या विषयात टोलवा टोलवी न करता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातून पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा अहवाल मागवावा व तेथे काय उपाययोजना करता येईल ते बघून पुणेकरांना दिलासा द्यावा अशी मागणी खर्डेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.






























