पुणे शहर

जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन

पुणे : जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत जिल्हा रुग्णालय पुणे व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच्या वतीने जनजागृती पर विविध उपक्रम व कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.

कोविड १९ च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत पुणे जिल्ह्यात अती जोखमीचे गट, स्थलांतरित कामगारांचे रहिवाशीचे ठिकाण, बाजार, गर्दीचे ठिकाणे तसेच गरोदर माता, तरुण वर्ग यांच्यात व्यापक जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून एचआयव्ही तपासणीसाठी प्रोत्साहित करणे, रक्तदान शिबीरे घेणे जे उपाचारापासून दुरावले आहेत, उपचारात खंड पडलेले आहेत अशा सर्वांना पुन्हा राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाशी जोडण्याकरीता जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच मातेकडून होणाऱ्या बाळाला एच आय व्ही संसर्गापासून प्रतिबंध करणे, रिक्षा ड्रायव्हर , किन्नर, अती जोखीम गट, ट्रक ड्रायव्हर, घरेलु महिला व पुरुष कामगार यांची कार्यशाळा याबाबत व्यापक जनजागृती मोहीम अधिक प्रभावी करण्यात येणार आहे.

तज्ञांकडून पी एल एच आय व्ही तरुणांसोबत भेदभाव आणि एच आय व्ही चा प्रतिबंध, एचआयव्ही संसर्ग असलेल्यांना सेवासुविधा, सकारात्मक जीवनशैली, एचआयव्ही चा देशाच्या विकासावर होणारा परिणाम, तरुणांची भूमिका व जबाबदारी, एचआयव्ही तपासणी आणि औषधोपचार अशा विविध विषयांवर व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत.

या बरोबरच जिल्हास्तरावर ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोशल मीडियावर एक मिनिटाचा प्रचारात्मक व्हिडिओ जीआयएफ सेल्फी विथ स्लोगन स्पर्धा व मास्क डिझाईन स्पर्धा घेण्यात आली आहे. प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांका च्या विजेत्यांना सन्मानपत्र चिन्ह देण्यात येणार आहे सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभागी होण्यास जिल्हा शल्य चिकित्सा डॉ. अशोक नांदापूरकर यांनी आवाहन केले आहे. जिल्हास्तरावर जागतिक एड्स दिनाच्या विविध कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद सोनवणे, जिल्हा पर्यवेक्षक मारोती गायकांबळे सुधीर सरवदे यांनी केले आहे असे जिल्हा रुग्णालय व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात सांगण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये