कोथरूडकरांनी अनुभवला शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व सोहळा ; छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराचा घुमला आवाज..

कोथरूड : तुतारीचा नाद, छत्रपती शिवाजी महाराज की जय चा जयघोष, फुलांची उधळण अन् महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा क्षण अनुभवताना उपस्थितांच्या अंगावर शहारा उभा राहिला. निमित्त होते ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोथरूड व्यासपीठच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे..
कोथरूड व्यासपीठ चे अध्यक्ष श्याम देशपांडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पद्मविभूषण श्री बाबासाहेब पुरंदरे लिखित आणि दिग्दर्शित शिवराज्याभिषेक सोहळा महाराष्ट्र कीर्ति सौरभ यांनी सादर केला. भव्य अशा रंगमंचावर सादर झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात उपस्थित सर्व शिवकालामध्ये सामावून गेले. महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला त्यावेळी आपणही उपस्थित होतो अशीच अनुभूती पुणेकरांना यावेळी आली. अनेक पुणेकर पालक आपल्या लहान मुलांसह हा दैदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोथरूड मधील पेठकर साम्राज्य जवळ असणाऱ्या सूर्यकांत काकडे फार्म च्या मोकळ्या जागेत हा सोहळा पार पडला.
या सादर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. अतिशय उत्तम प्रकारे सादर झालेल्या या सोहळ्यामुळे उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले. शिवराज्याभिषेक सुरू असताना उपस्थितांमधून आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेने सारा परिसर दणाणून गेला.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजार वाडकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य सरकारतर्फे वर्षभर विविध उपक्रमांचे करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्यभिषेक दिना निमित्त देशभर हिंदू साम्राज्य दिन साजरा करण्यात येत आहे. शिवरायांच्या इतिहासाची नव्या पिढीला माहिती होण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक गावात जाणता राजा महानाट्याचे मोफत प्रयोग आयोजित करणार आहे. गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकार प्रयत्नशील आहे. विद्यापीठांमध्ये गड किल्ल्याच्या संवर्धनाचा एक कोर्स घोषीत झाला की ज्यातून अनेक तरुण तरुणी गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारला उपलब्ध होणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या कल्पनेतील हिंदू राष्ट्र आहे ते हिंदुराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. महाराजांच्या ज्या हिंदु राष्ट्रांमध्ये माणसाच्या व्यवहारासाठी जोडलेल्या अनेक गोष्टी आहेत त्या आगामी काळात पूर्ण करून एक आदर्श नागरिक म्हणून या देशांमध्ये खूप मोठा समुदाय निर्माण व्हावा की ज्या समुदायाच्या आदर्श नागरिक म्हणून वागण्याचा संपूर्ण जगावर परिणाम व्हावा असा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा.
रविंद्र वंजारवाडकर म्हणाले, दोन जून पासून ते सहा जून पर्यंत एक लाख गावांमध्ये शिवराज्याभिषेकाचा उत्सव आज संपन्न होत आहे. आणि आपल्या देशात च नाही तर जगातल्या अनेक देशांमध्ये हा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे.या जगामध्ये एकमेव हिंदू राजा आहे.ज्याचा राज्याभिषेक 350 वर्ष पूर्वी झाला तरी पण तो आज तितक्याच उत्साहाने आणि तितकाच आश्वासक पद्धतीने साजरा होतो.



शाम देशपांडे म्हणाले, शिव राज्याभिषेक सोहळा हा हिंदू साम्राज्य दिन म्हणून आपण साजरा करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध पैलू भावी पिढीला माहीत होणे आवश्यक आहे. आपल्या पिढीला शिवरायांचा काळ पाहता आला नाही. पण या महा नाट्याच्या माध्यमातुन शिवरायांच्या आयुष्यातील प्रसंग आपल्याला पहाता यावेत, महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवता यावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



