गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : जेष्ठ नेते शरद पवार यांचं निवासस्थान सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात वकील गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईतील गिरगाव न्यायालयाने सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सरकारी वकिल अॅड प्रदीप घरत यांनी जोरदार युक्तीवाद करत सदावर्तेंच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. पण सदावर्तेंच्या वकील मृण्मयी कुलकर्णी यांना अॅड घरत यांचे आरोप खोडून काढत सदावर्तेंना पोलिस कोठडी का देऊ नये, अशा प्रकारचा युक्तीवाद केला. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना वकील मृण्मयी कुलकर्णी यांनी सूडबुद्धीने पोलिस कारवाई करत असल्याचा आरोप केला. तसंच आरोपींना पोलिस कोठडी का हवी, याचं एकही कारण किंवा पुरावा पोलिस देऊ शकले नाहीत. सूडभावनेने पोलिस सदावर्तेंशी वागत आहेत, असं त्या म्हणाल्या. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायमूर्ती एन. एम. पटेल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.







