कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय व नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने महास्वच्छता अभियान..

कोथरुड : कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग व नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी समाजामध्ये संत गाडगे महाराज यांच्या स्वच्छता जागृतीच्या महान कार्याचा वारसा रुजावा व स्वच्छते विषयीचे महत्व लोकांना कळावे याविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
हे स्वच्छता अभियान संपूर्ण कोथरूड उपनगरांमधील झोपडपट्टीच्या डोंगर उतार व टेकडी परिसरातील भाग म्हणजे किष्किंधानगर, सुतारदरा, ए. आर. ए. आय. रोड, डहाणूकर कॉलनी, लक्ष्मीनगरच्या पाठीमागील टेकडीचा परिसर आदी ठिकाणी राबवण्यात आले. सदर स्वच्छता महाअभियानामध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे १२४६ स्वयंसेवक, ४३ आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. या अभियानाद्वारे एकूण ४ हजार किलो सुका कचरा व प्लास्टिक जमा करण्यात आले.
यावेळी नागरिकांना ओला व सुका कचरा वर्गीकरण करा, आपला परिसर स्वच्छ ठेवावा, निसर्गरम्य टेकडीचा परिसर स्वच्छ ठेवा, निसर्गाची देणगी निसर्गाला द्या, प्लास्टिकचा वापर टाळा पर्यावरणाचे रक्षण करा, कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करा, पाण्याचा जपून वापर करा, आपल्या आरोग्याचे रक्षण करा, उघड्यावर निसर्गरम्य वातावरणात व नदी नाल्यात कचरा टाकू नका आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि स्वच्छ भारत अभियानामध्ये पुणे शहराला नंबर १ मध्ये आणण्यासाठी पुणे महानगरपालिका सहकार्य करा असेही आवाहन करण्यात आले.

सदर अभियान कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक महापालिका आयुक्त केदार वझे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार, प्रमोद चव्हाण, संतोष तारकर, वैभव घटकांबळे, शिवाजी गायकवाड, रूपाली शेडगे, गणेश साठे, गणेश चोंधे, हनुमंत चाकणकर यांच्या निरिक्षणाखाली राबवण्यात आले. मोकादम वैजीनाथ गायकवाड, अण्णा ढावरे, सुभाष पड्ये, गजानन कांबळे, साईनाथ तेलंगी, अशोक कांबळे, संजय कांबळे, विजय पाटील, महेश जामगे, प्रमिला दळवी इत्यादी मुकादम सहभागी झाले.



