पुणे स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशन आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोथरूड भागातून स्मार्ट सायकल शेअरिंग याेजना सुरु करण्यात आली. याला नागरिकांनीही मोठा प्रतिसाद दिला. मात्र सहा- आठ महिन्यातच या सायकली पुणे शहरामधून गायब झाल्या आहेत.
सुरुवातीला या याेजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. सध्याचे चित्र मात्र वेगळे आहे.या सायकली नेमक्या का गायब झाल्या. असा सवाल नागरिक उपस्थित करित आहेत. या सायकलींचा कोथरूडसह शहरातील वापर जवळजवळ थांबला असून या याेजनेत सर्वप्रथम ज्या कंपनीने सायकली पुरवल्या हाेत्या त्या कंपनीने आता माघार घेतली आहे. दोन खासगी कंपनीच्या शहरातील सर्व सायकल मागे घेण्यात आल्या आहेत. यातील एका कंपनीच्या सायकल तांत्रिक दुरुस्तीनंतर पुन्हा शहरात दाखल होणार आहे.
कोथरूडमधील कर्वे रस्ता,पौड रस्ता, एरंडवणे आणि कर्वेनगर परिसरातील रस्त्यांलगतच्या पदपथावर सर्वत्र स्मार्ट सिटी योजनेतील आणि खासगी कंपनीच्या शेअरिंग सायकल पाहायला मिळत होत्या. मात्र नवीन वर्षांत अचानकपणे या सायकल दिसेनाशा झाल्या.
गेल्या वर्षी ही याेजना शहरात सुरु केली. अगदी कमी पैशात आणि ऑनलाईन पद्धतीने या सायकल भाड्याने मिळू लागल्या. सुरुवातीला नागरिकांनी या सायकलींचा वापर केला. जस जशी सायकलींची आणि याेजनेत सहभागी सायकल कंपन्यांची संख्या वाढू लागली, या याेजनेला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली. सायकली चाेरीला जाणे, त्यांची ताेडफाेड, कुठेही लावणे अशा अनेक तक्रारी समाेर आल्या. नागरिकांनी या सायकलींचा वापर कालांतराने कमी केल्याने सायकली या पदपथावर धूळखात पडून राहू लागल्या होत्या.
या याेजनेत सर्वप्रथम सहभाग घेतला हाेता, त्या खासगी कंपनीने आपल्या सर्व सायकल मागे घेतल्या आहेत. संपूर्ण भारतातूनच त्यांनी सायकल मागे घेतल्याचे त्यांच्या वेबसाईटवर सांगितले आहे. तर पालिका आणि स्मार्ट सिटीचे प्रशासन रस्त्याची कामे चालू असल्याने या सायकली मागे घेतल्याचे सांगत आहे. या याेजनेचा प्रतिसाद असाच कमी हाेत राहिला तर प्रशासन ही याेजना मागे घेणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे
संपूर्ण पुणे शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सायकल संख्या
एकूण सायकल संख्या ८ हजार
सध्या उपलब्ध सायकल ६ हजार
एकूण खासगी कंपनी ४
त्यापैकी २ कंपन्याच्या सायकल उपलब्ध
स्वतःसोबतच शहराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पुणे शहरामध्ये सुरू असलेली शेअरिंग सायकल योजना सुरु ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग गरजेचा आहे. याचे भान ठेवून आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक तरुणांनी सायकल वापरण्यास प्राधान्य दिले आहे
संकेत जोशी (नागरिक) म्हणाले,या सायकल चा नागरिक मोठ्या प्रमाणात वापर करीत होते. या सायकलींना पुरेशी सुरक्षा नसल्याने माथेफिरू लोकांनी सायकलींचे नुकसान करणे सुरू केले. मात्र यावर उपाययोजना करण्याएवजी ही योजनाच बंद करणे हा नागरिकांवर अन्याय आहे.
मनोज शिंदे(नागरिक) म्हणाले, नागरिकांना या योजनेचा मोठा फायदा आहे. प्रशासनासोबतच नागरिकांनीही सायकलींच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडली पाहिजे. ही चांगली योजना बंद होऊ नये.
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.