राजु श्रीवास्तव ब्रेन डेड घोषित; हृदयाचे कार्यही अनियमित

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं ब्रेन डेड झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं आहे. श्रीवास्तव यांच्या हृदयाचे कामही अनियमित होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी राजू यांच्या कुटुंबियांना या संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिली आहे. राजू श्रीवास्तव यांच्या शरीराला ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होत नसल्यानं त्यांचा चेहरा काळा पडत चालला आहे. राजू यांच्या शरीराचा खालचा भाग कार्यरत आहे. त्यामुळेच डॉक्टरांनी त्यांना अजूनही व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर ठेवलं आहे. त्यांना बरं करण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. राजू यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी प्रयत्नांची पराकष्टा केली जात आहे. परंतु अद्याप त्यांच्या प्रकृतीमध्ये अपेक्षित अशी सुधारणा झालेली नाही.
राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी एम्स इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं.त्या दिवसापासूनच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजू जिममध्ये ट्रेडमिलवर वर्कआऊट करत असताना त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर ते बेशुद्ध झाल्यानं त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं. तेव्हापासून त्यांच्यावर सातत्यानं उपचार सुरू आहेत.
राजू यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची महिती डॉक्टरांनी दिली. राजू यांच्यावर तातडीने एंजिओग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या हृदयात १०० टक्के ब्लॉकेज असल्याचं आढळून आलं. ही परिस्थिती अतिशय गंभीर असल्यानं डॉक्टरांनी राजू यांच्या हृदयात दोन स्टेंट लावले आहेत. १३ ऑगस्ट रोजी राजू यांचा एमआरआय काढला. त्यामध्ये त्यांच्या मेंदूची एक नस दबली गेल्याचं समोर आलं आहे.
















