कर्वेनगर मध्ये झाडाची फांदी अंगावर पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

कर्वेनगर : कर्वेनगर मधील अलंकार पोलीस चौकी जवळ झाड पडून दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राहुल जोशी (वय 49 रा. कर्वेनगर एसबीआय बँकेसमोर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे.
जोशी हे कर्वेनगर मधील समर्थ पथ परिसरातून जात असताना त्यांच्या अंगावर झाडाची मोठी फांदी पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. अलंकार पोलीस स्टेशन पासून जवळच ही घटना घडली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी जोशी यांना ससून रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना घडल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या फांद्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या फांद्या बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
पावसाळ्यापूर्वी झाडांची पाहणी करून धोकादायक फांद्या काढल्या जातात मात्र तशा प्रकारचे काम महापालिकेच्या उद्यान विभागाकडून झाले नसल्याचा आरोप आता नागरिकांकडून केला जात आहे.







