उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद ; २ मार्चला ठरणार भाजप की महाविकास आघाडी..

पुणे : मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा आणि चिंचवड मतदार संघाच्या जागेसाठी आज पोट निवडणूक पार पडली. या दोन्ही मतदार संघात निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांचे भवितव्य आज वोटिंग मशीनमध्ये बंद झालं आहे. २ मार्च २०२३ रोजी मतदान मोजणी होणार असून या दिवशी चुरशीच्या ठरलेल्या या दोन्ही मतदार संघात कोण बाजी मारणार हे ठरणार आहे.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत कसबा मतदार संघात ४५.२५ तर चिंचवड मतदार संघात ४१.१ टक्के मतदान झाले. दुपार पर्यंत मतदानाची टक्केवारी कमी होती. दुपारनंतर मतदार मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले.
कसबा मतदार संघातून भाजप चे हेमंत रासने आणि काँग्रेस चे रवींद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत असून चिंचवड मतदार संघात राष्ट्रवादीचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप व अपक्ष राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत आहे. महाविकास आघाडी व भाजप, शिंदे गट यांनी प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीत गुलाल कोण उधळणार याबाबत महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. भाजपाकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांच्यासह १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.या निवडणुकीत अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहण्यास मिळाल्या. राज्यातील बडे नेते या पोट निवडणूकीसाठी पुण्यात तळ ठोकून होते.
ही निवडणूक सगळ्याच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली असताना.आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली.त्यावेळी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी रविवार पेठेतील मनपा शाळा क्र.९ मध्ये, तर महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी नू.म.वी शाळेत मतदान केल. त्यानंतर ११ वाजण्याच्या सुमारास श्रीमती नाथीबाई दामोदर ठकारसी कन्या शाळेत मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, कुणाल टिळक आणि कुटुंबीयांनी मतदान केले.
भाजपचे उमेदवार मतदान करण्यासाठी भाजपचे कमळ चिन्ह असलेला शेला घालून घेल्याने त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. रासने यांनी आचार संहितेचा भंग केल्याने त्यांच्या कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली.
पुण्याचे खासदार गिरीश बापट प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज मतदान प्रक्रियेत सहभागी होणार का याबाबत चर्चा सुरू असताना सायंकाळी पाचच्या सुमारास बापट यांनी व्हील चेअर वर येऊन अहिल्यादेवी शाळेतील मतदान केंद्रात मतदान केले.




