पुणे शहर

अयोध्या ही जगाची सांस्कृतिक राजधानी व्हावी यासाठी मार्गक्रमण सुरू : स्वामी गोविंददेवगिरी महाराज

माधव भांडारी लिखित ‘अयोध्या’ ग्रंथाचे प्रकाशन

पुणेः– श्रीराम हेच या देशाचे बळ आहे. जोपर्यंत श्रीरामचे चिंतन आहे, तोपर्यंत हा देश बलवान राहणार आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या  माध्यमातून जागतील सर्व श्रीराम भक्तांचे सेतूूूबंध तयार करण्यात येईल. अयोध्या ही जगाची सांस्कृतिक राजधानी व्हावी, असे हे मार्गक्रमण सुरू आहे. या देशाचा वैभवकाळ जवळ आला असून त्याकरीता शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखे बळ निर्माण होणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजांकडे जसे न थकणारे, न थांबणारे, न विकले जाणारे आणि न वाकणारे असे मावळे होते, तशाच कार्यकर्त्यांच्या बळावर हे कार्य पुढे जाणार आहे, असा विश्वास  श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी व्यक्त केला.

परममित्र प्रकाशनातर्फे भारतीय जनता पक्षाचे उप प्रदेशाध्यक्ष माधव भांडारी लिखित ‘अयोध्या’ या  ग्रंथाचे प्रकाशन आज श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह महेशराव कर्पे, महापौर मुरलीधर मोहोळ,  भाजपाचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपाचे शहर सरचिटणीस राजेश पांडे, सभागृह नेते गणेश बीडकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, श्रीनाथ भिमाले, प्रकाशक माधव जोशी आदी उपस्थित होते. यावेळी  श्रीराम जन्मभूमी न्यासाला एक लाख रूपये देणगी दिल्याबद्दल नगरसेविका वृषालीताई चौधरी, नगरसेविका श्रद्धा प्रभुणे यांना ‘अयोध्या’ पुस्तकाची एक प्रत मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आली.

स्वामी गोविंददेवगिरी महाराज म्हणाले की, याविषयावर अशा प्रकारचे पुस्तक कोणत्याच भाषेत लिहिले गेलेले नाही. अयोध्या या विषयाचा आणि त्यासाठीच्या आंदोलनाचा मी अभ्यास केला आहे. पण या अभ्यासाच्या संकलनापेक्षा अधिक सांगण्याचे काम हे पुस्तक करते आहे. मला जे माहित नव्हते, तशा ब-याच गोष्टी या पुस्तकात मला पहायला मिळाल्या आहेत. ग्रंथांमुळे अंतकरण किती प्रगल्भ होते, याची मला जाणीव आहे. विवेकानंदांना देखील ग्रंथांनी घडवले. त्यांच्यासारखे इतिहासाचे ज्ञान अन्य कोणालाही नव्हते. ‘अयोध्या’ या ग्रंथातून तुम्हला या विषयाची सखोल माहिती मिळेल. तुमच्या घरात असलेला हा ग्रंथ तुमच्या बालकांना प्रेरणा देईल.

पुढे ते म्हणाले, भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यानंतर त्यांच्या तोलामोलाचे कोणते व्यक्तिमत्व देशात झाले असेल तर ते शिवाजी महाराजांचे आहे. कारण ते रामायण आणि महाभारत या दोन ग्रंथांच्या गोष्टींनी घडले आहेत. ज्यांना इतिहास कळतो, ते भविष्य निर्माण करू शकतात. श्रीरामांचे  मंदिर एकदम भव्यदिव्य असणार आहे. श्रीराम मंदिरासाठीचा संघर्ष स्फुल्लिंग निर्माण करणारा आहे. आजपर्यंतच्या 79 युद्धात तीन लाखांपेक्षा जास्त लोकांचे बलिदान दिले. जयकुमारी नावाच्या एका राणीने तीन हजार महिलांचे सैन्य निर्माण करून मंदिरासाठी संघर्ष केला. एखाद्या भूमीच्या पुनःसंपादनासाठी अशा प्रकारचा लढा कोणीही दिलेला दिसत नाही. हा लढा अत्यंत प्रेरणादायी आहे. ज्या श्रीरामांसाठी हे घडले, त्या श्रीरामचंद्रांचे जीवन तर सगळ्यात जास्त प्रेरणादायी आहे.

छत्रपती आपल्याला अजून कळले आहेत का हादेखील प्रश्नच आहे. रामायण आणि महाभारतातील सगळ्या सद्गुणांची यादी करा आणि ती एकत्रित बघायची असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघा, असे खुद्द स्वामी विवेकानंदांनी सांगितले होते. छत्रपतींची प्रेरणा काहींनी खरेच घेतली आहे, तर काहींनी केवळ त्याचा मुखवटा आपल्या चेह-यावर लावला आहे.

1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, नव्या पिढीला राम जन्मभूमीचा इतिहास माहिती होणे आवश्यक होते. हे केवळ या इतिहासाचे एकत्रिकरण नाही, तर याविषयाचा सखोल अभ्यास माधव भांडारी यांनी या पुस्तकाच्या निमित्ताने केला आहे. हा इतिहास एकीकडे मनात चीड निर्माण करणारा आहे, तर दुसरीकडे श्रीरामाच्या भक्तीने ऊर भरून येणारा आहे. इतिहासाचे अनेक पैलू या पुस्तकात आहेत. 

यावेळी ‘अयोध्या’ हे  पुस्तक लेखनामागील भूमिका विशद करताना माधव भांडारी म्हणाले की, अयोध्या आणि राम जन्मभूमी बाबत नेहमीच अपप्रचार, संभ्रम आणि खोटे मुद्दे प्रस्थापित केले गेले. म्हणजे श्रीरामांचा जन्म भारतात झालाच नाही, इथपर्यंत मिथ्या प्रचार करण्यास विरोधक धजावले. रामजन्म भूमीचे आंदोलन हा वैचारिक लढाईचा भाग असून या वैचारिक लढ्याबाबत तयार केलेल्या अपप्रचाराचा प्रतिवाद म्हणजे हे पुस्तक आहे.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह महेशराव कर्पे, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, भाजपाचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश पांडे यांनी केले. सूत्रसंचालन संदिप खर्डेकर यांनी केले. पुनीत जोशी यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये