भोग आणि मुक्ती देण्याची ताकद भगवंताच्या नामस्मरणात : ह.भ.प सोपान महाराज सानप

बावधन : भागवतांच नामस्मरण करा. भोग आणि मुक्ती देण्याची ताकद भगवंताच्या नामस्मरणात आहे. भगवंताच्या नामस्मरणाने भोग आणि मुक्ती नुसती मिळत नाही तर ती दासी होते. नुसतं मिळणे आणि दासी होणे यात फरक आहे त्यामुळे भगवंताचं नामस्मरण करा असे विचार तुकोबांच्या अभंगाचा दाखला देत ह.भ.प सोपान महाराज सानप यांनी व्यक्त केले.
वडील कै ज्ञानोबा बाबुराव दगडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त बापूसाहेब दगडे पाटील यांनी आयोजित केलेल्या भव्यदिव्य अशा कीर्तन महोत्सवात ह.भ.प सोपान महाराज सानप यांनी कीर्तन सेवा केली. ते म्हणाले आज वडिलांवर अंतःकरणापासून प्रेम करणारी मंडळी कमी आहेत. आज बापूसाहेब यांनी वडिलांच्या आठवणीत एवढा मोठा कीर्तन सोहळा ठेवला आहे. वडिलांना अंधपणा आल्यानंतर बापूसाहेबांनी वडिलांची काठी होण्याचं काम केलं. त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.

कीर्तन महोत्सवात ह.भ.प सोपान महाराज सानप यांनी संत तुकाराम महाराजांचा
ज्याचे गर्जता पवाडे । कळिकाळ पाया पडे ।।
तो हा पंढरीचा राणा । पुसा साहा चौ अठरा जणा ।।
चिंतिता जयासी । भुक्ति मुक्ति कामारी दासी ।।
वैकुंठासी जावे । तुका म्हणे ज्याच्या नावे ।।
हा अभंग कीर्तन सेवेकरीता निवडला होता. सानप महाराज सांगतात तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात, ज्याच्या नामाचे नामस्मरण करताच काळ देखील त्याच्या पायाशी लोळण घेतो, त्याच्या पायाशी शरणागती पत्करतो अशा हा पंढरीच्या राणाची ख्याती आहे. ते म्हणतात खात्री करून घ्यायची असेल तर सहा शास्त्रे, चार वेद आणि अठरा पुराणे यांना विचारून पहा, ते देखील तुम्हाला हेच सांगतील.
पुढे ते म्हणतात या विठुरायाचे चिंतन, भजन केले असता भुक्ति आणि मुक्ति दोन्हीही घरच्या दासी होतात. म्हणजे भक्ताला जे जे पाहिजे ते ते सर्व त्याला उपलब्ध होते. ज्याच्या नावाच्या आधारे वैकुंठाला जाता येते, सहज वैकुंठवासी होता येते असा हा श्री हरी विठ्ठल आहे. त्याचे नामस्मरण करा.









