महाराष्ट्र

न दिसणाऱ्या शत्रूशी लढण्यासाठी समाजाने एकत्र यावे : देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

देशाचे आणि समाजाचे नुकसान करीत असलेल्या न दिसणाऱ्या शत्रूशी लढण्यासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. ड्रग्स व तत्सम अंमली पदार्थांच्या माध्यमातून काही लोक समाज पोखरण्याचे दुष्कर्म करीत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी सजग राहा, सैनिक म्हणून पुढे या, हीदेखील एक प्रकारची देशभक्ती आणि समाजाची सेवा आहे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित “नशामुक्त नवी मुंबई” अभियानाचे नवी मुंबई, वाशी येथील सिडको ऑडिटोरियम येथे उद्घाटन संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

Img 20240404 wa0017281298374058713843994116

यावेळी वनमंत्री गणेश नाईक, प्रख्यात अभिनेता आणि “नशामुक्त नवी मुंबई” या उपक्रमाचे आयकॉन जॉन अब्राहम, आमदार मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विधानपरिषद सदस्य विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, प्रशांत मोहिते, रश्मी नांदेडकर, संजयकुमार पाटील, महाविद्यालयीन विद्यार्थी, नशामुक्तीचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आदी उपस्थित होते.

“Art of silence” या मूकनाट्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते “नशामुक्त नवी मुंबई” अभियानाच्या चित्रफितीच्या प्रकाशनाने संपन्न झाले.

Screenshot 20250107 102552 gallery7663635181886032329

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, ड्रग्समुळे स्वतःच्या आयुष्यासोबत आपण देशाचेही नुकसान करतो हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. प्रवाहासोबत जाणारे अनेक असतात, परंतू चांगले करण्यासाठी प्रवाहाविरुद्ध जावे लागते, त्यासाठी शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक ताकद गरजेची आहे. “नशामुक्त नवी मुंबई” हे अभियान अतिशय महत्वाचे आहे. गृह खात्याच्या पहिल्याच बैठकीत पोलिसांना सांगितले की, आपल्याला ड्रग्स विरुद्ध मोठी लढाई लढायची आहे. सरळ लढाई करता येत नाही म्हणून अंमली पदार्थांच्या देश पोखरण्याचा प्रयत्न केला जातोय.

ते म्हणाले, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी गृह विभागासंबंधी घेतलेल्या बैठकीत कॅनडाचे उदाहरण दिले. ड्रग्जमुळे कॅनडा सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून पडला. मात्र भारत ड्रग्जविरूद्धची ही लढाई जिंकू शकतो. देशातील सर्व राज्यांनी एकमेकांना सहकार्य करीत ही लढाई एकत्र लढायला हवी. सर्वांनी एकत्र येवून संपूर्ण भारत ड्रग्स मुक्त करायचा आहे, हा आपला निर्धार असायला हवा. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या ८८२८ ११२ ११२ या टोल फ्री क्रमांकाचा प्रभावी वापर करा.

Img 20250108 wa00015478995629769254033

शेवटी फडणवीस यांनी नशामुक्तीसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल नवी मुंबई पोलीस दलाचे अभिनंदन केले. तसेच सेलिब्रिटी म्हणून जॉन अब्राहम यांच्या कामाबद्दलही कौतुक केले. आणि पुन:श्च एकदा निर्धार करु या नशामुक्तीसाठी लढण्याचा, “ड्रग्स फ्री नवी मुंबई” करण्यासाठी सैनिक होण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

अभिनेता जॉन अब्राहम यांनी आपल्या मनोगतात “नशामुक्त नवी मुंबई” या अभियानाच्या आयोजनाबद्दल नवी मुंबई पोलिसांचे अभिनंदन करून आपले आयुष्य हे शिस्तमय असावे. आपण आपल्या आचरणाने मित्र परिवारामध्ये आदर्श निर्माण करावा आणि एक उत्तम नागरिक म्हणून जगावे, असे आवाहन उपस्थित युवकांना केले.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, चांगल्या कामाचा ध्यास, हीच खरी नशा आहे. सर्वांनी चांगल्या कामाचा ध्यास घ्यावा. नवी मुंबई महानगरपालिका सर्व आघाड्यांवर प्रथम क्रमांकावर आहे. तसेच नशामुक्त अभियानातही अव्वल राहील, हा विश्वास आहे.

सुरुवातीस नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आपल्या प्रास्ताविकात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने आतापर्यंत राबविलेल्या विविध उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली.

Img 20240404 wa0013281293529802052601663206

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये