नाटक आणि नाट्य रसिक यांच्यातील घट्ट नात्याची प्रचिती ‘जर तरची गोष्ट’ नाटकाच्या निमित्ताने पुण्यात मिळाली पहायला…

‘जर तरची गोष्ट’ नाटकाच्या २०० व्या प्रयोगला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
आमोल साबळे
पुणे : नाट्य रसिक आणि नाट्य कलावंत यांच्यामधील नातं किती घट्ट आहे याची प्रचिती जर तरची गोष्ट नाटकाच्या प्रयोगावेळी पहायला मिळाली. रविवारी जर तरची गोष्ट या नाटकाचा २०० वा प्रयोग बालगंधर्व नाट्यगृहात रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडला. नाटक सुरू होण्यापासून संपेपर्यंत अशा काही घटना घडल्या की, पुण्यातील नाट्य रसिक मराठी नाटकांवर किती प्रेम करतात याचे दर्शन झाले.
बालगंधर्व नाट्यगृहात रविवारी ५.३० वाजता जर तरची गोष्ट नाटकाचा २०० वा प्रयोग सुरू होणार होता. नाट्य गृहाच्या प्रेशद्वारा जवळ नाटकाच्या २०० व्या प्रयोगानिमित्त काढण्यात आलेली रांगोळी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. नाट्यगृहाबाहेर रसिक प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली होती. ५.३० वाजून गेले तरी प्रेक्षकांना आत सोडण्यात आले नव्हते त्यामुळे नाटक उशीरा सुरू होतंय असं दिसत होत.
साधारण ६ वाजता प्रेक्षकांना आत सोडण्यात आले. प्रेक्षक जेव्हा नाट्यगृहात आले तेव्हा रंगमंचावरचं चित्र पाहून अचंबित झाले. नाटकातील प्रमुख कलाकार असलेले उमेश कामत, प्रिया बापट, पल्लवी पाटील, आशुतोष गोखले हे स्वतः स्टेज वरील सेटअप लावण्यास बॅक स्टेज कलाकारांना मदत करत होते. हे काम सुरू असतानाच उमेश कामत यांनी पुढे येत प्रयोग सुरू होत असल्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. आधी नाट्यगृहात सुरू असलेला कार्यक्रम उशीरा संपल्याने नाट्यगृह ताब्यात यायला उशीर झाला आणि त्यामुळे धावपळ झाल्याचे त्याने सांगितले. तेवढयात प्रेक्षकांमधून आवाज आला मदतीला येऊ का आम्ही ? त्यावर उमेशने आभार व्यक्त करत नाटकांवर प्रेम करणाऱ्या रसिकांचे आभार मानले.

एक तास उशीर होऊनही उत्साही वातावरणात नाटक सुरू झालं. नाटकातील वाक्यांवर टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. नाटक रंगात होत आणि मध्येच आशुतोष गोखलेच्या माईकचा तांत्रिक बिघाड झाल्याने खरखर आवाज येऊ लागला. उमेशन नाटक थांबवलं आणि बिघाड सोडवण्यास सांगितलं. हा बिघाड सोडवताना निर्माण झालेल्या विनोदाने आणखीनच मनोरंजन झालं. पण उमेश चा नर्व्हस चेहरा पाहून पुन्हा प्रेक्षकांमधून आवाज आला जाऊ देरे होत राहतं असं.. अडचणीत रसिक प्रेक्षकांची मिळणारी साथ कलाकारांनाही भारावून टाकणारी होती. उमेश म्हणाला म्हणूनच २०० वा प्रयोग पुण्यात घेतला. एम एच १२ वाले भारीच आहेत. माईकचा प्रश्न सुटला आणि नाटक पुन्हा त्याच रंगात सुरू झाले. उत्तम सादरीकरणाने रसिक प्रेक्षकांनी नाटक डोक्यावर घेतले. नाटक संपल्यानंतर सर्वच कलाकारांनी, निर्मात्यांनी, बॅक स्टेज कर्मचाऱ्यांनी, शो आयोजक यांनी एकत्र येत प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल, प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले.
पुण्यातील नाट्य रसिक नाटकांवर किती प्रेम करतात हे रविवारी ‘जर तरची गोष्ट’ नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने पदोपदी जाणवले. आणि म्हणूनच नाट्य कलावंत पुण्यात प्रयोग करण्यात का उत्सुक असतात ते या निमित्ताने पुन्हा कळाले.





