जगण्यातला जिव्हाळा जपणारं पुस्तक म्हणून ‘सहजच मनातलं शब्दात’ या पुस्तकाकडे पाहावे लागेल : डॉ. माधवी वैद्य

वारजे साहित्यिक कट्ट्यावर संध्या बेडेकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : समाजातील वास्तवतेचे प्रतिबिंब या पुस्तकातून उमटले असून जीवनाला आवश्यक असलेले शहाणपण या पुस्तकातील प्रत्येक लेखनातून मिळत जाते. एकप्रकारे संसाराला उपयोगी असणारी गाथा या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या हातात पडली असल्याचे मत जेष्ठ लेखिका डॉ. माधवी वैद्य यांनी संध्या प्रकाश बेडेकर लिखित सहजच मनातलं शब्दात या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात व्यक्त केले.
पुणे महापालिका मराठी भाषा संवर्धन समिती, वारजे साहित्यिक कट्टा आयोजित कार्यक्रमात संध्या प्रकाश बेडेकर लिखित सहजच मनातलं शब्दात या पुस्तकाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक ,शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह वी. दा. पिंगळे, कर्नल प्रकाश बेडेकर उपस्थित होते.
माधवी वैद्य म्हणाल्या कोरोनाच्या संकटानंतर बऱ्याच काळाने आज वारजे साहित्यिक कट्ट्यावर आल्याने मनाला आनंद वाटत आहे. साहित्य हा जीवनासाठी महत्वाचा विषय असून बाबा धुमाळ व दिपाली धुमाळ यांनी सुरू केलेल्या या वारजे साहित्यिक कट्ट्यावर साहित्याची मनाची भूक भागवली जाते हे विशेष नमूद करावे वाटते. ज्यावेळी वारजेत राहिला आले त्यावेळीचे वारजे व आताचे वारजे यात खूप फरक झाला असून धुमाळ दाम्पत्याने वारजेचा कायापालट केला आहे. त्यांनी सोयी सुविधा देऊन नागरिकांची जगण्याची व्यवस्था लावली व आता साहित्याच्या माध्यमातून लोकांच्या मनाची वैचारिक भूक भागवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत हे कौतुकास्पद आहे.
पुढे त्या म्हणाल्या सहजच मनातलं शब्दात अस कधी होत नाही. लिहिणारे व्यक्तिमत्त्व सुसंस्कृत असल्यामुळेच सहजच मनातलं शब्दात उतरून या उत्तम पुस्तकाची निर्मिती झाली आहे. जगण्यातला जिव्हाळा जपणार हे पुस्तक संध्या बेडेकर यांनी आपल्याला दिल्याने त्यांचे अभिनंदन व कौतुक
संध्या बेडेकर म्हणाल्या जगात चांगली लोक आहेत हे पुस्तक प्रकाशनाच्या प्रक्रियेत मला समजले. कोरोनाच्या निराशाजनक वातावरणात माझ्यातले छुपे गुण मला कळाले व हे पुस्तक लिहिण्यासाठी स्फूर्ती मिळाली. परिस्थितीवर मात कशी करायची हे शाळेत शिकवले जात नाही ते आपल्याला शिकावे लागते. कोरोना काळ माझ्यासाठी संधी ठरला. आतापर्यंतच्या जीवनप्रवासात मला जे जाणवलं जे उमगले ते शब्दात उतरवल व आज या पुस्तकाची निर्मिती झाली. हे पुस्तक तयार करताना पती कर्नल प्रकाश बेडेकर यांनी खूप साथ दिली.
वी. दा. पिंगळे म्हणाले, बेडेकरांच खाद्य पदार्थ रुचकर असतं हे ऐकलं होतं पण बेडेकरांच शब्द सुद्धा रुचकर असू शकतात हे पुस्तक वाचून कळलं. आयुष्य किती आनंदाने जगात येते, हे सांगतानाच नैराश्य दूर करणार हे पुस्तक आहे. वारजेत एवढी प्रतिभावंत लोक राहतात याचा आनंद वाटतो. समाजाशी नात्याशी प्रामाणिक असतात तेच लोक अशी सुंदर साहित्य निर्मिती करू शकतात. जीवनमूल्ये व संस्काराची पेरणी करणार हे पुस्तक वाचनीय आहे.
पुढे पिंगळे म्हणाले की, मला नेहमी असं वाटतं माणसाचं माणूसपण टिकवण्यासाठी, लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी जे लोकप्रतिनिधी साहित्याची जोपासना करतात ती माणसे इतिहासाच्या पानावर कोरली जातात. त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे बाबा धुमाळ व दिपाली धुमाळ हे एक आहेत. धुमाळ दाम्पत्य आपल्या भागातील नागरिक आनंदी आणि प्रसन्न राहिला पाहिजे यासाठी साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून, कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन सातत्याने करत असतात.
बाबा धुमाळ यांनी मनोगत व्यक्त करताना वारजे साहित्यिक कट्टा सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका भंडारी यांनी केले.




