शिवसेनेचा सोमय्यांना ठार मारण्याचा प्लॅन होता; चंद्रकांत पाटलांचा आरोप

पुणे : महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार राडा पाहण्यास मिळाला. यावेळी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना दुखापत झाली आहे. या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहे. ‘या व्हिडीओवरून असं दिसतंय की हा सोमय्या यांच्यावरील सुनियोजित प्राणघातक हल्ला होता. सोमय्यांना ठार मारण्याचाच शिवसेनेचा प्लॅन होता’, असा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन किरीट सोमय्यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘किरीट सोमय्यांवर हा भ्याड हल्ला होता. या व्हिडीओवरून असं दिसतंय की हा सोमय्या यांच्यावरील सुनियोजित प्राणघातक हल्ला होता. सोमय्यांना ठार मारण्याचाच सेनेचा प्लॅन होता. किंबहुना शिवसेनेनं आज सोमय्या यांना ठार मारण्याचाच प्लॅन केला होता असं या हल्ल्याच्या क्लिपिंग वरून दिसतंय’ असा दावा पाटील यांनी केला. या प्रकरणी पुणे पोलिसांनी हल्लेखोर शिवसैनिकांवर 307 आणि 326 कलमानुसार गुन्हा दाखल करावा, अशी आमची आग्रही मागणी आहे. आम्ही हे सर्व पुरावे कोर्टात दाखल करू जर पोलिसांनी सु मोटो गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही स्वस्थ बसणार नाही’ असा इशाराही पाटील यांनी दिला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या घटनेवर तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही. तसेच लोकशाहीचा मुडदा पाडू नका, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर दिली आहे. “राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे? आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही! महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.



