पुणे महापालिका निवडणूकीत महायुती होईल पण आमच्या टर्मवरच चंद्रकांत पाटील यांचे महत्वाचे विधान…

विनायक बेदरकर
पुणे : राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. यातच राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुती बाबत महत्वाचे विधान केले आहे. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती होईलच पण ती आमच्या टर्म वर होईल. असे सांगतानाच महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच मोठा पक्ष असल्याचा सूतोवाच पाटील यांनी केले आहेत.
कोथरूडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त देशप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यात व वही महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.भाजप शहर उपाध्यक्ष मंदार बलकवडे यांच्या वतीने एरंडवणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

येत्या काही दिवसात महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. या निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पुणे महानगर पालिका निवडणूकीत भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढविणार की स्वतंत्र याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत. यातच पाटील यांनी केलेल्या विधानामुळे महायुतीचे संकेत मिळत आहेत.
पाटील म्हणाले, मी आणि मुरलीधर मोहोळ पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी एकत्रित पाहतोय. आम्ही दोघेही नम्रतेने वागणाऱ्यांशी नम्र आणि दादागिरी करणाऱ्याशी दादागिरी” करू असा थेट इशारा इतर पक्षांना राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
एकूणच चंद्रकांत पाटील यांच्या आजच्या विधानामुळे भाजप पक्ष महापालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका मोठ्या ताकदीने लढणार असल्याचे सूतोवाच त्यांनी दिले आहेत. महायुतीच्या जागा वाटपातही भाजप वर्चस्व दाखवणार असल्याचे दिसत आहे.






