वास्तूशास्त्र तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची चाकूने भोसकून हत्या; पाहा VIDEO

मुंबई/हुबळी : ‘सरल वास्तू’ फेम वास्तूशास्त्रातील तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची कर्नाटकमधील हुबळी जिल्ह्यात हॉटेलमध्ये चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्हीत हॉटेलच्या रिसेप्शनमध्येच चंद्रशेखर गुरुजी यांना हल्लेखोरांनी चाकूने भोसकल्याचं दिसत आहे. यानंतर तिथे उपस्थित लोक घाबरुन पळत असल्याचंही दिसत आहे.
घटनेची माहिती मिळताच हुबळीच्या पोलीस आयुक्तांनीही घटनास्थळी धाव घेतली. “मोबाइल टॉवरच्या आधारे आम्हाला काही माहिती मिळाली आहे. तपासानंतरच हत्येमागचं कारण समजू शकेल. आम्ही सध्या कुटुंबीयांचेही जबाब नोंदवत आहोत”, असे पोलिसांनी सांगितले आहे.
तीन दिवसांपूर्वी त्यांच्या कटुंबातील एका मुलाचा मृत्यू झाला होता. यासाठीच ते हुबळी येथे आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. चंद्रशेखर गुरुजी हे मूळचे कर्नाटकच्या बालगकोट येथील होते. तिथेच त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी कंत्राटदार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांना मुंबईत नोकरी मिळाली आणि ते इथेच स्थायिक झाले. दोन वर्ष त्यांनी रिअल इस्टेट कंपनीत काम केलं. यानंतर त्यांनी नोकरी सोडून आपली कंपनी सुरु केली. पण एका व्यक्तीने त्यांची १५ लाखांची फसवणूक केली. त्यानंतर त्यांनी अनेक गावं, शहरांचे दौरे केले. नंतर त्यांनी वास्तू विषयावर अभ्यास सुरु केला. ‘सरल वास्तू’ या कार्यक्रमातून त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि ते घराघरात पोहोचले.
