शिंदे-फडणवीस सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार

मुंबई : राज्यात सरकार स्थापन होऊन तब्बल महिना उलटल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. त्यामुळे विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. संबंधित खात्यांचे मंत्री आणि पालकमंत्र्यांची नियुक्ती न झाल्यामुळे जनतेची अनेक कामंही खोळंबून पडली आहेत. एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्ट सातत्याने सुनावणीसाठी पुढील तारखा देत आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ रखडल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता जनतेमध्ये सरकारविषयी नकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते, हे लक्षात घेऊन उद्या मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळी नव्या मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते. त्यादृष्टीने विधिमंडळाच्या परिसरात हालचालींना सुरुवात झाली आहे. विधिमंडळ परिसरातील पोलीस बंदोबस्त अचानक वाढवण्यात आला आहे. तसेच विधिमंडळ सचिवांनी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या सगळ्या घटना पाहता बुधवारी सकाळी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नंदनवन बंगल्यावरील बैठकीनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी जाऊ शकतात. त्यावेळी हे दोघेजण राज्यपालांना मंत्रिमंडळ विस्ताराविषयी सांगतील, अशी माहिती आहे.
गेल्या 39 दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच राज्याचा कारभार हाकत आहेत. त्यामुळे अनेक खात्यांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे उद्या मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार होण्याची शक्यता आहे. विस्तारात पहिल्या टप्प्यात १६ ते १७ मंत्र्यांचा समावेश असेल, अशी चर्चा आहे.
भाजपमधून कोणाला संधी मिळणार?
१) चंद्रकांत पाटील
२) सुधीर मुनगंटीवार
३) गिरीश महाजन
४) प्रवीण दरेकर
५) राधाकृष्ण विखे पाटील
६) गणेश नाईक
शिंदे गटातील संभाव्य मंत्री कोण?
१) दादा भुसे
२) उदय सामंत
३) गुलाबराव पाटील
४) शंभूराज देसाई
५) दीपक केसरकर
६) सदा सरवणकर







