फेसबुक, ट्विटर, सोशल मीडियाचा गैरवापर लोकशाहीसाठी धोकादायक : सोनिया गांधी

नवी दिल्ली : सत्ताधारी प्रस्थापितांच्या संगनमताने ज्या प्रकारे सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी आणि राजकारणासाठी सोशल मीडियाचा सोयीस्कर गैरवापर केला जात आहे. हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून आपले नेते, पक्ष आणि त्यांच्या प्रॉक्सींकडून खोट्या प्रचारकी राजकीय कथानकांची मांडणी करण्याचं प्रमाण वाढत आहे, असं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
मला अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. आपली लोकशाही हॅक करण्यासाठी सोशल मीडियाचा दुरुपयोग वाढत आहे. फेसबुक, ट्वीटरसारख्या आंतरराष्ट्रीय सोशल मीडिया कंपन्या सर्व पक्षांना योग्य संधी देत नसल्याचं वारंवार समोर आल्याचंही त्यांनी सांगितलं. सत्ताधारी प्रस्थापितांच्या संगनमताने ज्या प्रकारे सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे ते आपल्या लोकशाहीसाठी घातक असल्याचा इशारा सोनिया गांधींनी यावेळी दिला.




