देशाचा वारसा मोठा असताना आरसा वाईट का होत चालला आहे याचा विचार व्हावा : संजय आवटे

पुणे : देशामध्ये नकळत जे धर्मांधतेचे, धार्मिक विभाजनाचे बीज पेरले जात आहे ते रोखले नाही तर निर्माण होणाऱ्या भयानक परिस्थितीला उद्याच्या पिढीला सामोरे जावे लागेल. तुम्ही भावी पिढ्यांसाठी सर्व काही घ्याल, पण त्यांच्यासाठी शांतता सलोखा नसेल तर उद्याचा देश संपून जाईल. त्यामुळे उद्याच्या पिढ्यांसाठी देशात शांतता सलोखा हवा आहे असे वाटत असेल तर महात्मा गांधींनी देशाची जी वीण घातली आहे ती भक्कम राहिली पाहिजे असे प्रतिपादन लेखक, पत्रकार संजय आवटे यांनी व्यक्त केले.
पुणे महापालिका, मराठी भाषा संवर्धन समिती, वारजे साहित्यिक कट्टा आयोजित शब्दब्रम्ह व्याख्यानमालेत तिसऱ्या दिवशी गांधी आडवा येतो या विषयावर संजय आवटे यांचे व्याख्यान झाले. यावेळी अध्यक्ष म्हणून स्मिता पाटील शाळेचे प्रा. एस. आर. पाटील तसेच व्याख्यानमालेचे संयोजक विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी नगरसेवक बाबा धुमाळ उपस्थित होते.
आवटे म्हणले, देशाचा वारसा मोठा असताना आरसा वाईट का होत चालला आहे याचा विचार करायला हवा. आपण थोर महापुरुषांची नावे घेतो पण त्यांचा वारसा विसरतो. तो वारसा कृतीत आणला पाहिजे. जो पर्यंत आपण मुलांना जातीच्या पलीकडे नेत नाही तोपर्यंत त्यांना भारत कळणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे
देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या काळात अनेक वैविध्य असल्यामुळे हा भारत देश देश म्हणून उभा राहणार नाही असं त्यावेळच्या अभ्यासकांना वाटत, तशी मांडणी त्यांच्याकडून केली जात होती. पण त्याचवेळी या वैविध्याला बलस्थान करून भारत नावाचा देश उभा राहिला. हा देश एवढा मोठा कसा झाला, त्याचं वेगळंपण, वैशिष्ट्य समजून घेतलं पाहिजे. माझा देश सर्वांचा आहे म्हणून सुदंर आहे हा वारसा उद्याच्या पिढ्यांना पोहचवला पाहिजे.

गांधीजींकडे एकदा ख्रिश्चन व्यक्ती आला आणि बायबल देत त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकार असे सांगितले, त्यावर गांधीजींनी त्याला भगवद्गीता घ्या आणि आणखी चांगले ख्रिश्चन व्हा असा सल्ला दिला. गांधीजींचे स्वतःच्या हिंदू धर्मावर प्रेम होते पण ते दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नव्हते आणि याच पायावर देश उभा राहिला.
1928 मध्ये इंग्लंडमध्ये देखील महिलांना मताचा अधिकार नव्हता. मताच्या अधिकारासाठी आंदोलन केल्यानंतर महिलांना जिवंत जाळण्यात आलं, पण माझ्या देशात स्वतंत्र्याच्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक व्यक्तीला मताचा अधिकार मिळाला कारण गांधी, नेहरू, आंबेडकर यांना त्यावेळेची जनता निरक्षर असली तरी जनतेच्या सामूहिक शहाणपणावर विश्वास होता.



अमेरिकेने गांधींचा मार्गाने जायचा ठरवल म्हणूनच गोरे आणि काळे विभागून देश चालणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं.
गांधीजींनी मानवी मूल्यांवर आधारित देश उभा करण्याचा प्रयत्न केला. देशाची सत्ता सर्वसामान्य माणसाकडे राहिली पाहिजे. बहुमत व अल्पमत यालाही महत्व राहिले पाहिजे व देशातील शेवटचा घटकही आनंदी असला पाहिजे तरच देश उभा राहील असे त्यांचे मत होते.
हिटलर मुसोलिनी व गांधीजी हे तिघेही एकाच काळातील पण हिटलर व मुसोलिनी यांचा वारसा त्यांचा देशही सांगत नाही पण गांधीजींचा वारसा सारा देश सांगतो आहे. आज बाहेरच्या देशात गेल्यानंतरही हा गांधीजींच्या देशातून आला आहे असं बोललं जातं यातच सर्व काही आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इतर साठ देशांमध्ये क्रांती झाली आणि त्याची प्रेरणा गांधीजी होते हे लक्षात घेणे गरजेचे आहे.



