पुणे शहर

पुणे महापालिकेचे विभाजन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय, उरळी-फुरसुंगीची नगरपालिका

पुणे : भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वांत मोठी महापालिका बनलेल्या पुणे महापालिकेतून उरळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळण्याचा धक्कादायक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या दोन्ही गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आदेश मुख्यमंत्री, तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या संदर्भातील आदेश पुढील १५ दिवसांत काढण्यात येणार आहेत.

पुणे महापालिकेच्या हद्दीलगतच्या उरळी आणि फुरसुंगी या दोन गावांसह आणखी नऊ अशा ११ गावांचा समावेश ऑक्टोबर २०१७ मध्ये महापालिकेत करण्यात आला होता. पालिकेतील समावेशानंतर येथे गेल्या पाच वर्षांत विविध विकासकामांना गती देण्यात आली होती.

पालिकेच्या नियमांनुसार येथून मिळकतकर वसूल करण्यास सुरुवात झाली होती. मात्र, पालिकेतर्फे पुरेशा सुविधा दिल्या जात नसताना मोठ्या प्रमाणात कर घेतला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. त्याबाबत वारंवार बैठका घेतल्या जात असूनही मिळकतकरात सवलत दिली जात नव्हती.

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर माजी मंत्री विजय शिवतारे यांनी या गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्याचबरोबर मिळकतकर कमी करण्याची मागणीही लावून धरली होती. या पार्श्‍वभूमीवर शिंदे यांनी मंगळवारी मुंबईत घेतलेल्या बैठकीत दोन्ही गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याचे ठरविण्यात आले.

या बैठकीला माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिकेचे उपायुक्त अजित देशमुख उपस्थित होते. या दोन्ही गावांमधील नागरिकही या वेळी उपस्थित होते.

Img 20221126 wa02123601048173337149659

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये