अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : येरवडा येथील गुंजन चौकात तीन आठवड्यापूर्वी डंपरने दिलेला धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एका खाजगी रुग्णालयात मागील अनेक दिवसांपासून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. या घटनेमुळे पुणे शहरात होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ही महिला येत येरवडा येथील गुंजन चौकात रस्ता ओलांडत असताना तिला 31 जानेवारी रोजी डंपरने धडक दिली होती. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघातात जखमी झालेल्या मीना गिरीश राठोड (वय 37, रा. व्हाइट हाऊस सोसायटी, येरवडा ) यांना उपचारासाठी तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तातडीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. मागील तीन आठवड्यांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र दुर्दैवाने मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. गंभीर अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे दाखल गुन्ह्यात कलम वाढ करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली.
येरवडा येथील व्यापारी गिरीश राठोड यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, दोन लहान मुले, सासू-सासरे, तसेच त्यांचे दीर डॉ. केतन राठोड असा परिवार आहे. येरवडा परिसरातील गुंजन चौक, शास्त्रीनगर चौक, पर्णकुटी चौक, डॉ. आंबेडकर सेतू चौक, सादल बाबा चौक, डॉ. आंबेडकर सोसायटी मुख्य चौक, येरवडा पोस्ट चौक, नवीन अग्रसेन रस्त्यालगत कॉमर्स झोन चौक, मेंटल कॉर्नर चौक, गोल्फ चौक, चंद्रमा चौक या मुख्य चौकांमध्ये वारंवार गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहेत. हे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.




