येरवड्यात टेम्पोने रिक्षाला दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू; रिक्षा चालकासह दोन तरुणी जखमी

पुणे : टेम्पोने रिक्षाला दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. या अपघातात रिक्षा चालकासह दोन तरुणी देखील जखमी झाल्या आहेत. यश बाळासाहेब खरचंद (वय 18, रा. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, येरवडा पुणे) या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. येरवड्यातील ईशान्य मॉल रस्त्यावर शांती रक्षक सोसायटीच्या गेट समोर हा अपघात झाला. या परिसरात मोठ्या प्रमाणावर झालेली अतिक्रमणे, गतिरोधकांचा अभाव याअपघाताला कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. जड वाहनांची वाहतूकबंद करण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हा त्याच्या दोन बहिणींसोबत नगर रस्त्याने रिक्षा क्रमांक (एम एच 12 एन डब्ल्यू 7413)ने सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथे घरी चालला होता. ईशान्य मॉल रोडवर शांतीरक्षक सोसायटीच्या गेट जवळ समोरून येणारा तीन चाकी टेम्पो (क्रमांक एम एच 12 व्हीबी 9275) मधील चालकाने दिलेल्या जोरदार धडकेमध्ये यश रिक्षा मधून बाहेर फेकला गेला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर झाली. उपचारासाठी त्याला तात्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.



या अपघातात रिक्षा चालकासह त्याची एक बहीण गंभीर तर एक बहीण किरकोळ जखमी झाले आहेत. यश हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई-वडील व दोन बहिणी असा परिवार आहे. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांसह नातेवाईक व मित्रपरिवार यांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी टेम्पोचालक नाझीम बाबूलाल सय्यद (वय 42, रा. नागपूर चाळ, येरवडा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



वाहतूक पोलीस तसेच महापालिका वाहतूक नियोजन व अतिक्रमण विभाग यांना वारंवार कळवून देखील या ठिकाणी वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. जड वाहतुकीला बंदी असून देखील या रस्त्याने सर्रास जड वाहनांची वाहतूक केली जाते. यासंदर्भात वाहतूक उपायुक्त यांना विविध पक्ष संघटना यांनी निवेदन देऊन जड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी केली होती. याबाबत वाहतूक विभागाकडून जड वाहतूक बंद करण्याबाबत निर्णय घेतला असला तरी देखील प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केलेली नाही.



मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या दुतर्फा झालेली अतिक्रमणे तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक यांच्यामुळे निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या गंभीर घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी वाहतूक पोलिसांना घेराव घालून याबाबतीत जाब विचारला. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या या गंभीर समस्या संदर्भात तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिक तसेच विविध पक्ष संघटना यांनी दिलेला आहे. वाहतूक विभागाच्या वतीने यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले. पोलीस उपनिरीक्षक होले पुढील तपास करीत आहेत.



