पुण्यात झूमकार ॲपवरून महागड्या गाड्यांची चोरी; पाकिस्तान सीमेजवळून हस्तगत

पुणे/बाडमेर : झूम कार ॲप वरून गाडी बुक करून अपहार व फसवणूक केलेल्या साठ लाख रुपये किमतीच्या तीन महागड्या गाड्या चंदननगर पोलिसांनी राजस्थान येथून पाकिस्तानच्या सीमेजवळून हस्तगत केल्या आहेत. पुण्यातील चंदननगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी ही माहिती दिली.
याप्रकरणी आरोपी सुफियान जे. चव्हाण (वय 19, रा. फतेहगंज, वडोदरा, गुजरात) याला मध्य प्रदेश येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्यात चंदननगर पोलिसांना यश मिळाले आहे. या आरोपीकडून पुण्यातील झूम कार ॲपवरील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीतून प्राची रोहित पठारे (रा. थिटे वस्ती, खराडी) यांची एमजी हेक्टर ही कार ( एम एच 12 टी के 2847) कंपनीचा विश्वासघात करून फसवणूक करून नेल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे यांच्यासह पथकाने गोपनीय माहितीवरून तसेच तांत्रिक विश्लेषणावरून केला. आरोपी सुफियान चौहान याला इंदूर (मध्यप्रदेश) येथे सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले.
मागील तीन ते चार महिन्यांपासून झूम कार ॲपवरती विविध व्यक्तींची ओळखपत्रे अपलोड करून त्याच्या व त्याच्या साथीदाराच्या बँक अकाउंट वरून पेमेंट करून पुणे व मुंबई येथून गाड्या घेतल्याचे निष्पन्न झाले. गाड्यांची राजस्थान येथे विक्री केल्याचे त्याने सांगितले. राजस्थान येथील पाकिस्तान सीमेजवळ असणाऱ्या बाडमेर जिल्ह्यात जाऊन पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्ह्यातील एमजी हेक्टर गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा तपास करत असताना वाघोली येथील किया सेलटोस क्रमांक (ओडी-2- बी क्यू 7131) तसेच धानोरी येथील टाटा सफारी क्रमांक (एम एच 12 – यु एफ 3846) या दोन कारदेखील झूम कार ॲपवरून फसवणूक करून राजस्थान येथे विक्री केल्याचे निष्पन्न झाले. या तीनही गाड्या चंदननगर पोलिसांनी ताब्यात घेऊन आरोपीला अटक केली आहे.



यापूर्वी आरोपीने मुंबई येथे देखील याच स्वरूपाचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलीस उपयुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे निरीक्षक मनीषा पाटील, उपनिरीक्षक अरविंद कुमरे, उपनिरीक्षक दिलीप पालवे, पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, सचिन रणदिवे,सुहास निगडे, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, नामदेव गडदरे,सुभाष आव्हाड, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, गणेश हांडगर, विकास कदम यांच्या पथकाने या महत्वपूर्ण गुन्ह्याचा शिताफीने तपास केला आहे.





