अनुकंपा व रोजंदारी सेवकांना कामावर रुजू करा : धुमाळ

पुणे : पीएमपीएमएल मधील अनुकंपा तत्वारील व कार्यशाळेतील रोजंदारी सेवक आदेशानुसार गेले ६ महिन्यापासुन घरी आहेत. अनुकंपावरील रोजंदारी सेवकांमध्ये बहुतेक कर्मचारी ह्या महिला आहेत . काम बंद असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे याबाबत योग्य ती कार्यवाही करुन या सेवकांना कामावर रुजु करुन घ्यावे अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी पीएमपीएमएल चे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांच्याकडे केली आहे.
सहा महिने काम नसल्याने वेतनही नाही. काही सेवक हे भाड्याच्या घरात राहतात , मुलांचे शिक्षण व इतर घर खर्चामुळे त्यांना आर्थिक व मानसिक तणावाखाली जगाव लागत आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचा विचार केला जावा असे धुमाळ यांनी म्हंटले आहे.
कारोना च्या पार्श्वभूमीवर शहरातील पीएमपीची प्रवासी सेवा बंद असताना बदली व रोजंदारीवरील चालक, वाहक कर्मचा-यांना आर्थिक फटका बसला होता.त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. आता बस सेवा सुरू झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करुन रोजंदारीवरील चालक वाहकांना कामावर रुजु केल्याबद्दल धुमाळ यांनी जगताप यांचे अाभार मानले आहेत. या निर्णयामुळे या सेवकांच्या हाताला काम मिळाले व त्यांना जीवन जगण्यासाठी उभारी मिळाली आहे. अशाच प्रकारे अनुकंपा तत्वारील व कार्यशाळेतील रोजंदारी सेवकांचा ही विचार करून त्यांना कामावर रुजू करून घ्यावे अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.