राष्ट्रीय

वनवासी, गिरीजन शब्दांवर बंदी घालण्याची मागणी

नवी दिल्ली : आदिवासींना वनवासी किंवा गिरिजन म्हणूनही हिणवले जाते. यापुढे असे होऊ नये आणि भारतीय सैन्य दलात आदिवासी रेजिमेंट निर्माण करावी, अशी मागणी चंद्रपूरचे (Chandrapur) खासदार बाळू धानोरकर यांनी संसदेत केली आहे. आपल्या देशातील आदिवासी लोक परंपरागत मागासलेले आहेत आणि नेहमीच बहुसंख्याक समुदायाकडून त्यांची उपेक्षा करण्यात आली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

खासदार धानोरकर (MP Balu Dhanorkar) म्हणाले, आदिवासी लोकांना उल्लेख करताना त्यांना वनवासी किंवा इतर काही संबोधणे म्हणजे त्यांच्या अपमान आहे आणि वारंवार असे म्हणून त्यांना पिडा दिली जाते. ते या भूमीवरचे मूळ निवासी आहेत. त्यामुळे त्यांना अशा शब्दांत संबोधू नये, यासाठी कायदेशीर कार्यवाही केली पाहिजे. ज्याप्रमाणे अनुसूचित जातीसाठी हरिजन या शब्दप्रयोगावर बंदी आणण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आदिवासींना वनवासी किंवा गिरिजन म्हणण्यावरसुद्धा कायद्याने बंदी आणली पाहिजे.

याव्यतिरिक्त भारतीय सैन्यात (Indian Army) वेगवेगळे रेजिमेंट आहेत. जसे की शीख, गोरखा, राजपूत, जाट रेजिमेंट. त्याचप्रमाणे आदीवासींसाठीसुद्धा स्वतंत्र रेजिमेंट निर्माण केली गेली पाहिजे. सर्वाधिक काळ जंगलात राहिलेले हे लोक लढवय्ये आहेत. त्यामुळे हे एक सशक्त रेजिमेंट सिद्ध होईल, असा विश्‍वास आहे. यामुळे आदिवासी समुदायातील लोकांना एक सन्मान प्राप्त होईल आणि जास्तीत जास्त आदिवासी युवक सैन्यात भरती होतील. कारण त्यांचे लोक युवकांना तसे प्रोत्साहन देतील. त्यामुळे या मागणीवर सरकारने गांभीर्याने विचार करावा, असे खासदार धानोरकर म्हणाले.

अनादीकाळापासून आदिवासींच्या नशिबी उपेक्षाच आली आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून त्यांना लांब ठेवण्यात आले आहे. आपल्या संविधानात देशातील सर्व समुदायांना दिलेल्या अधिकारांनुसार आदीवासींनासुद्धा त्यांचे हक्क दिले गेले पाहिजे. त्यांना योग्य सन्मान आपण बहाल करण्याची वेळ आलेली आहे. कारण तो त्यांचा हक्क आहे. त्यामुळे सरकारने याचा गांभीर्याने विचार करून योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी सभागृहात केली.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये