महाराष्ट्र

सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार, कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मुंबई : किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयने फेटाळला आहे. नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. सोमय्या यांचे वकील पावनी चढ्ढा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आयएनएस विक्रांत बचावसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत घोटाळा केल्याचा सोमय्या पिता- पुत्रांवर आरोप आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्यामुळे अटकेची टांगती तलवार त्यांच्यावर कायम आहे. 

संजय राऊतांनी याप्रकरणातील कागदपत्र समोर आणल्यानंतर सोमय्यांविरोधात नवी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, याव्यतिरिक्त किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या आणि इतर यांच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधातील फसवणुकीचा गुन्हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. 

संजय राऊतांनी काय आरोप केले? 
शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत घोटाळा केल्याचे आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेला निधी हा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं होतं. आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबाबतही माहिती मागवली होती. मात्र, राज्यपाल कार्यालयात असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयानं दिली असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. हा देशद्रोहीपणा असून त्याचा तपास केंद्रीय संस्थांनी करावा असं आव्हानही राऊत यांनी केलं. सोमय्या हे सीए असल्यामुळे असा पैसा कसा पचवायचा याची त्यांनी माहिती असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी राज्य सरकारनं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

सोमय्या पिता-पुत्रांना चौकशीसाठी समन्स
किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना काल पोलीस ठाण्यात हजर राहण्याचं समन्स पोलिसांनी बजावलं होतं. मात्र सोमय्या पिता-पुत्र काल चौकशीला हजर राहणार नाहीत अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली होती. आयएनएस विक्रांत बचावसाठी जमवलेल्या निधीप्रकरणी सोमय्या यांच्याविरोधात मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोमय्या पितापुत्रांना समन्स बजावलं होतं. यासाठी त्यांना शनिवारी सकाळी 11 वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु, ते चौकशीला हजर राहू शकले नाहीत. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये