पुण्यात मांजरीमधील श्रीराम हॉटेलमध्ये सरपंचावर गोळीबार; दगड, विटांनीही मारहाण

पुणे : मांजरीचे सरपंच पुरुषोत्तम ऊर्फ अण्णा धारवाडकर यांच्यावर मांजरीमधील श्रीराम हॉटेलमध्ये गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी नंदू शेडगे, चंद्रकांत घुले व त्यांच्या तीन मित्रांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सरपंच धारवाडकर यांना दगड, विटांनी देखील मारहाण करण्यात आली. यात सरपंच जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम धारवाडकर हे काही जणांसह रात्री श्रीराम हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांच्या टेबलवर बसलेल्या संजय झुरंगे याचे चंद्रकांत घुले याच्याबरोबर भांडण झाले. धारवाडकर यांचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. भांडणानंतर आरोपी घुले याने फोन करुन साथीदारांना बोलावून घेतले. धारवाडकर जेवण करुन हॉटेलमधून बाहेर पडत असताना तिघे जण मोपेडवरुन तेथे आले. त्यांच्यातील एकाने धारवाडकर यांच्या दिशेने गोळीबार केला. ती गोळी धारवाडकर यांना लागली नाही. त्यानंतर त्यांनी तेथे पडलेल्या दगड, विटांनी धारवाडकर यांना मारहाण केली.
दगड डोक्यात घातल्याने त्यात सरपंच धारवाडकर जबर जखमी झाले. त्यानंतर आरोपी तेथे जमलेल्यां लोकांना धमकावून पळून गेले. लोकांनी धारवाडकर यांना तातडीने नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
याबाबत अण्णा धारवाडकर यांनी सांगितले की, या भांडणाशी आपला काही संबंध नव्हता. चंद्रकात घुले व नंदू शेडगे हे ओळखीचे असून त्यांच्या मित्रांनी केलेल्या मारहाणीमुळे डोक्याला जखम झाली आहे. डॉक्टरांनी ८ ते ९ टाके घातले आहे. हडपसर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.




