किशोरवयीन मुलांमध्ये गुडघेदुखीचा आजार का वाढतोय ; दुर्लक्ष करू नका (Osgood Schlatter Disease)

किशोरवयीन मुलांमध्ये लाॅकडाऊनमध्ये जास्त प्रमाणात निदर्शनात आलेला, आढळून आलेला गुडघेदुखीचा आजार म्हणजे (Osgood Schlatter Disease)
ऑस्गुड श्लेटर डिसिज. या आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळेत उपचार केले तर लवकरच रुग्ण बरा होतो व पुढील होणार त्रास टळतो.
डॉ. सचिन नागापूरकर (अस्थिरोग तज्ज्ञ)
आता गुडघेदुखी म्हटलं की , आपल्या समोर येतो तो वयोवृद्ध अथवा मध्यमवयीन वर्ग. याच वयात बहुतांश लोकांना गुडघेदुखीचा आजार होतो. परंतू किशोरवयीन मुले, मुलींमध्ये देखील गुडघेदुखी होऊ शकते असू शकते. कदाचित आपल्याला सामान्यांना ते पटणार नाही अथवा त्यावर विश्वास बसणार नाही.
किशोरवयीन वयोगट म्हणजे साधारणपणे वय वर्ष मुलांमध्ये 8 ते 14 टिनऐजेड आणि साधारणपणे 9 ते 13/14 वयात मुलींमध्ये आढळून येणारा गुडघेदुखीचा हा ऑस्गुड श्षेटर डिसिज ( Osgood Schlatter Disease). लहान मुलांमध्ये शरिरातील हाडे ही पार्टसमध्ये असतात आणि ठराविक वयोमानानुसार ती पार्टसमधील हाडे एकमेकांना जुळून एकसंघ हाड तयार होते. गुडघ्या सांध्याजवळ गुडघ्याच्या वाटी( Patella) पासून खाली जाणारा स्नायू जो खाली नडगीच्या हाडाला(Tibia..Tibial Tubrocity) ला जोडला जातो, त्या ठिकाणी काही कारणास्तव तो स्नायू व त्या ठिकाणी असणारे हाड ह्या मध्ये इन्फ्लमेशन होऊन त्या ठिकाणी तीव्र वेदना होतात. तो भाग सुजलेला गरम लागतो. व ह्या किशोरवयीन वयोगटातील मुलांना मुलींना वेदना होतात….
बर्याच वेळा पालक हे दुखणे छोटे आहे खूप खेळल्यामुळे दुखत असेल. खूप सायकल चालवल्यामुळे त्रास होत असेल असे गृहीत धरून घरगुती तात्पुरता उपाय करतात. बर्याच ठिकाणी मी अनुभवले आहे मुलांना वेदना खूप असतात पण घरातील आई वडील सोबतचे मित्र हा आजार दुर्लक्षित करतात आणि मग ज्या वेळी मुलाचा त्रास असह्य होतो, चार पावले टाकणे, गुडघा वाकवणे, मांडी घालून जमिनीवर बसणे, भारतीय बैठकीच्या शौचालयात बसणे कठीण होते तेव्हा ते दवाखान्यात येतात.
मग अश्या परिस्थितीत दुखणे कमी होण्यास जास्त कालावधी लागतो. बरेच दिवस औषध व्यायाम करावे लागतात. त्यामुळे ह्या किशोरवयीन वयोगटातील मुलांना जर गुडघेदुखी होत असेल तर लवकरात लवकर डाॅक्टरांकडे घेऊन जावून गरजेनुसार एक्स रे, एम आर आय. सिटीस्कॅन करणे आवश्यक असते. लवकर निदान व लवकर उपचार सुरू केले, आजाराविषयी माहीती घेतली तर निश्चितच किशोरवयीन वयोगटात पण गुडघेदुखी होऊ शकते व ती ठीक पण होऊ शकते हे समजेल.
हा ऑस्गुड श्लेटर डिसिज हा आजार तसा खूप जुनाच आहे. खूप कमी किशोरवयीन वयोगटातील मुलांना होतो त्यामुळे फारसा सहजासहजी असे रुग्ण दवाखान्यात येत नाहीत. पण ह्या लाॅकडाऊन च्या काळात मुले घरातच बसून होती. खेळण्याचे प्रमाण पण खूप वाढले होते. त्यातच किशोरवयीन वयोगटातील मुलांचे वजन वाढण्याचे प्रमाण पण खूप वाढले आहे.
सायकल चालवणे, खेळणे त्या मुळे कदाचित ह्या आजरामुळे दवाखान्यात येण्याचे प्रमाण नक्कीच थोडे वाढलेले आहे. खेळाताना, खेळून झाल्यावर मांडी घालून बसताना, चौड्यावर बसताना गुडघ्याभवती वेदना होतात. नडगीच्या हाडाच्या सुरवातीलाच सुज उंचवटा आलेला दिसतो.
निदान
ह्या आजाराचे निदान करणे तसे सोपे असते.
किशोरवयीन वयोगटातील रुग्णांना कोणताही मार लागलेला नसताना, अचानक सुरू झालेली गुडघेदुखी, खेळाताना वाढणारा त्रास, नडगीच्या हाडावर आलेली सुज, वेदना अश्या प्राथमिक तपासण्या मध्ये ह्या आजाराबाबत अंदाज येऊन जातो. गरजेनुसार गुडघ्याचे एक्स रे( एक गुडघा दुखत असेल तरी दोन्ही गुडघ्यांचे एक्स रे काढून निदान केले जाते) गरजेनुसार एम आर आय, सिटीस्कॅन पण काढावा लागू शकतो…..
उपचार
लवकर निदान व लवकर उपचार हेच प्रामुख्याने ह्या आजारावर मह्त्वाचे आहे. गरजेनुसार औषध, वेदनाशामक औषधे, मलम लावणे, त्या भागाला गरम गार पद्धतीने शेकणे, गरजेनुसार फिजिओथेरपिस्ट कडून विशिष्ट शेक व्यायाम करून घेणे, काही दिवस गुडघ्याला आराम म्हणून खेळण्यावर मर्यादा आणणे, थोडक्यात औषध उपचार व ठराविक व्यायाम काही प्रमाणात पथ्ये पाळून वाढत्या वयोमानानुसार हा आजार बरा होऊ शकतो.
क्वचित प्रसंगी त्या भागावर इंजेक्शन देणे किंवा फार क्वचित वेळा ऑपरेशन करण्याची गरज पडू शकते.
त्यामुळे किशोरवयीन वयोगटातील मुलांमध्ये जर काही दिवस त्रास देणारी गुडघेदुखी असेल तर ती दुर्लक्षित न करता लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घेऊन आजारची माहीती घेऊन औषधोपचार करून ती बरी करता येऊ शकते हे नक्की.




