पुण्यात शिवसेनेला मोठा धक्का; शाम देशपांडे यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

पुणे : पुण्याचे माजी शहर प्रमुख शाम देशपांडे यांनी शिवसेना नेतृत्वाला आव्हान देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. याबाबतचे पत्र नुकतेच त्यांच्याकडून समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईतील सभेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आक्रमक भाषेत टीका केल्याने माझे मन दुखावले गेले असल्याचे सांगत शाम देशपांडे यांनी शिवसेनेचे काम थांबवत असल्याचे जाहीर केले आहे.
पुण्यातील मेट्रो च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे फ्लेक्स देशपांडे यांच्या कडून लावण्यात आले होते. तेव्हाच ते पक्ष सोडणार अशी चर्चा सुरू झाली होती. पक्षातून यानंतर देशपांडे यांच्या वर नाराजी व्यक्त केली होती. अखेर त्यांनी पक्षाला रामराम केल्याने या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.







