अर्थजगत

आजपासून महागाईत ‘जीएसटी’ची भर; वेष्टनांकित अन्नपदार्थावर ५ टक्के कर, रुग्णालयांतील उपचारही महाग

पुणे : बिगर ब्रँडेड पण लेबल लावून विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांवर बहुचर्चित पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आजपासून लागू होणार आहे. त्यामुळे महागाईमध्ये आणखी भर पडणार असून सर्वसामान्यांंचं कोलमडलेले बजेट आणखीनच कोलमडणार आहे. कणिक, पनीर, दही यांसारख्या सुट्या व बिगर ब्रँडेड वस्तू विकताना त्यावर पाच टक्के जीएसटी वसूल करण्यात येणार आहे. त्याच वेळी ५,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रुग्णालय खोल्यांसाठी जीएसटी आकारण्यात येणार असल्याने वैद्यकीय सेवाही महागणार आहे.

जीएसटी वाढ

– सध्या १२ टक्के जीएसटी लागू असणाऱ्या शाई (प्रिटिंग, लेखन व चित्रकला यासाठी वापरली जाणारी), कटिंग ब्लेडसह मिळणारे चाकू, कागद कापण्याचे चाकू, पेन्सिल शार्पनर, एलईडी दिवे, चित्रकलेसाठी लागणारे साहित्य या सर्व वस्तूंवर आता १८ टक्के जीएसटी लागेल.

– सोलर वॉटर हिटरवर सध्या पाच टक्के जीएसटी लागत होता. त्यावर आता १२ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.

– रस्तेबांधणी, पूलबांधणी, रेल्वे, मेट्रो यासाठी दिले जाणारे कंत्राट, सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, स्मशानातील विधी व साहित्य यांवर आता १२ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी लागणार.

– रिझर्व्ह बँक, विमा नियामक व विकास प्राधिकरण (आयआरडीए) आणि सेबी या नियामक संस्था देत असलेल्या सेवांवर १८ टक्के जीएसटी लागणार.

– बायोमेडिकल कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या सुविधांवर आता १२ टक्के जीएसटी.

– बॅटरीसोबत असलेल्या विजेवर चालणाऱ्या वाहनांवर पाच टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये