ज्येष्ठ नागरिकांची सवलत रद्द करून रेल्वेने मिळवले 2242 कोटींचे अतिरिक्त उत्पन्न

नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट दरात असलेली सवलत रद्द करून भारतीय रेल्वेने मोठी कमाई केली आहे. या सवलती बंद केल्याने भारतीय रेल्वेला 2242 कोटींचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेच्या तिकीट दरात असणारी सवलत कोरोना काळात बंद करण्यात आली होती. कोरोनानंतर रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आल्यानंतरही प्रवास दरातील सवलत पुन्हा लागू करण्यात आली नाही. याबाबत ज्येष्ठ नागरिक वारंवार नाराजी व्यक्त करत असतात.
माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांना माहिती अधिकार कायद्या अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 दरम्यान, सुमारे 4.6 कोटी पुरुष, 3.3 कोटी महिला आणि 18,000 ट्रान्सजेंडर यांचा समावेश असलेल्या सुमारे आठ कोटी ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिली नाही. या कालावधीत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांकडून तिकिटाच्या माध्यमातून एकूण महसूल 5,062 कोटी रुपये मिळाले आहेत. यामध्ये सवलतीचा दर रद्द केल्याने 2,242 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळाला आहे.
सवलतीसाठी कोण पात्र
महिला ज्येष्ठ नागरिक 50 टक्के तिकीट सवलतीसाठी पात्र आहेत, पुरुष आणि ट्रान्सजेंडर सर्व वर्गांमध्ये 40 टक्के सवलत घेऊ शकतात. सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिलेची किमान वयोमर्यादा 58 वर्षे आहे, तर पुरुषांसाठी ती 60 आहे.
कोरोना महासाथीची लाट सुरू झाल्यानंतर भारतीय रेल्वेने विविध सवलती रद्द केल्या. कोरोनानंतरची परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतरही सवलतींवरील स्थगिती कायम आहे. मार्च 2020 पासून कोरोनामुळे देशातील रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. 2021 मध्ये रेल्वेसेवा हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली. मात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट दरात देण्यात येणारी सवलत अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.
