कोथरुडमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत

कोथरुड: १३ गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरयाचा जयघोषात कोथरुड, कर्वेनगर, वारजे परिसरात आपल्या लाडक्या गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मंडळाच्या व घरी बसवण्यात येणाऱ्या तसेच सोसायटीत बसवण्यात येणाऱ्या श्रीगणेशाची विधीवत पूजा करत प्रतिष्ठापना करण्यात आली.
आज सकाळपासूनच श्रींच्या आगमनाची तयारी जोरदार सुरु होती. मंडळाच्या व घरच्या गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी बालचमुपासुन ते मोठ्यापर्यंत सर्वांचीच लगबग सुरु होती.
कोथरुड मधील संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळ, कर्वे रस्त्यावरील जयदीप मंडळ, कोथरुड गावातील समस्त गावकरी मंडळ, पौड रस्त्यावरील साई मित्र मंडळ, आझादनगर मित्र मंडळ, संगम मित्र मंडळ, नवभुमी मंडळ एरंडवण्यातील भैरवनाथ तरुण मंडळ, देशप्रेमी मित्र मंडळ, राजबाग तरुण मंडळ, कर्वेनगर मधील विकास मित्र मंडळ, विठ्ठल रुक्मिणी मित्र मंडळ, मोरया मित्र मंडळ, गुलाबराव ताठे मित्र मंडळ, श्रीमान मित्र मंडळ, शहीद मित्र मंडळ वारजेतील श्रीमंत राजयोग मित्र मंडळ या व इतर मंडळांनी विधीवत गणरायाची पूजा करत गणरायाची प्रतिष्ठापना केली.
मागील दोन वर्ष गणेशोत्सवावरती कारोना चे संकट असल्याने अतीशय साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला होता. या वर्षी मात्र कोरोनाचे संकट टळल्याने यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत आहे.




