अब्दुल सत्तार यांच्या शिवीगाळ प्रकरणावर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया : पहा काय म्हणाल्या..

पुणे : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल खासदार सुप्रिया सुळे यांना अपशब्द वापरत शिवीगाळ केली होती. त्याचे पडसाद महाराष्ट्र भर उमटले होते. अनेक मान्यवरांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. परंतु सुप्रिया सुळे या याबाबत काही बोलल्या नव्हत्या. आज मात्र त्यांनी याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आपल्या सोशल मीडिया च्या अकाऊंट वर पोस्ट करत सुळे यांनी म्हंटले आहे की, महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात.
परंतु सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती , माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे.

मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया.



याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी , जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा ‘सुसंस्कृतच महाराष्ट्र’ आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. असे सुळे यांनी म्हंटले आहे.












